‘गोकूळ’उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २५ मार्चपासून शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:06+5:302021-03-13T04:44:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांची (गोकूळ) ३६५० पात्र संस्था प्रतिनिधींची अंतिम मतदार यादी ...

Gokul candidature application can be submitted from March 25 | ‘गोकूळ’उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २५ मार्चपासून शक्य

‘गोकूळ’उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २५ मार्चपासून शक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांची (गोकूळ) ३६५० पात्र संस्था प्रतिनिधींची अंतिम मतदार यादी शुक्रवारी दुग्ध विभागाने जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक मंगळवारी (दि. १६) करून २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. साधारणत: २ मे रोजी मतदान होईल.

‘गोकूळ’च्या निवडणुकीसाठी ३६५६ सभासद पात्र होते. त्यानुसार दुग्ध विभागाने संबंधित दूध संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागितले होते. प्रारूप यादीवर ७६ हरकती आल्या होत्या. यापैकी ३५ दुबार ठराव तर ४१ इतर हरकती होत्या, त्याची सुनावणी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्या समोर पूर्ण झाली. यामध्ये त्यांनी ४९ हरकती फेटाळल्या. शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी डॉ. गजेंद्र देशमुख यांनी अंतिम यादी प्रसिध्द केली. यादीत ३६५६ संस्थांचा समावेश असला तरी पाच संस्थांनी ठराव दाखल केले नाहीत तर एका संस्थेचा ठरावच हरकतीच्या सुनावणीमध्ये रद्द करण्यात आला. त्यामुळे ३६५० पात्र संस्था प्रतिनिधींची नावे आहेत.

अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची प्रक्रियाही सुरू केली जाते. त्यानुसार निवडणूक प्राधिकरणाच्या स्तरावर तयारी सुरू असून पहिल्यांदा पुढील आठवड्यात म्हणजे मंगळवार किंवा बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक होऊ शकते. त्यानंतर म्हणजे २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची मुदत १ एप्रिलपर्यंत राहिली तर दाखल अर्जांची छाननी त्यानंतर पात्र उमेदवारी यादी जाहीर हे ६ एप्रिलला होऊ शकते. माघारीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी असतो, त्यामुळे २२ एप्रिलला माघारीची मुदत संपल्यानंतर २ मे रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.

‘शिवाजीराजे’ भुयेवाडी न्यायालयात

दुग्ध विभागाने ठराव दाखल करण्यासाठी दिलेल्या कालावधीत भुयेवाडी येथील छत्रपती शिवाजीराजे दूध संस्थेचा ठराव आला नाही. आता त्यांनी यादीत समावेश करावा, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सहकारी की महसूल अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

‘गोकूळ’ची निवडणूक संवेदनशील असल्याने शक्यतो महसूल यंत्रणेकडे निवडणुकीची जबाबदारी देतात. मात्र यावेळेला सहकारातील अधिकाऱ्याकडेच जबाबदारी येण्याची शक्यता आहे. यासाठी विभागीय उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

Web Title: Gokul candidature application can be submitted from March 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.