‘गोकुळ’चे सव्वा तीन कोटींचे नुकसान-सतेज पाटील :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:12 AM2018-03-16T01:12:27+5:302018-03-16T01:12:27+5:30
कोल्हापूर : पॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या दराचा पुरावा दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
मेट्रो पॉलिथिलीन कंपनी ही ‘गोकुळ’ आणि कर्नाटक मिल्क फेडरेशनला पॉलिफिल्म पुरवठा करते. कर्नाटक मिल्क फेडरेशन, बंगलोरने सीआय फ्लेक्सो प्रिंटिंग ३ कलर प्रिंटिंग पॉलिफिल्म दर प्रतिकिलो जीएसटीसह १३४ रुपये ३७ पैसेप्रमाणे खरेदी केली असून, तेच ‘गोकुळ’ने १४१ रुपये १९ पैशांनी खरेदी केली आहे. यामध्ये प्रतिकिलो ६ रुपये ८२ पैसे फरक दिसून येत आहे.
सीआय फ्लेक्सो प्रिंटिंग ६ कलर प्रिंटिंग पॉलिफिल्म दर प्रतिकिलो जीएसटी १४८ रुपयांप्रमाणे कर्नाटक मिल्क फेडरेशनने खरेदी केले असून, ‘गोकुळ’चा हाच दर १७१ रुपये ८७ पैसे आहे. यामध्ये प्रतिकिलो २३ रुपये ८७ पैसे इतका फरक पडल्याचे दिसून येते. ‘गोकुळ’ने या दोन्ही प्रकारची १९०० टन पॉलिफिल्म खरेदी केली असून, या दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कर्नाटक मिल्क फेडरेशनचे कार्यकारी संचालक राकेशसिंग यांनी सन २०१७ मध्ये रोटोगॅव्हिअर आणि सीआय फ्लेक्स या फक्त प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहेत. यामध्ये पॉलिफिल्म दर्जामध्ये काही संबंध येत नाही, असे स्पष्ट करीत कॉमन टेंडर प्रसिद्धीला दिले होते. त्यामुळे मेट्रो पॉलिथिन कंपनीने दर कमी करण्याची तयारी दर्शवली. अशा पद्धतीने कर्नाटक मिल्क फेडरेशनने पॉलिथिन कंपनीकडून होणाऱ्या चुकीच्या दर आकारणीला आळा घातला होता, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘डुप्लिकेशन’ न होण्यासाठीच जादा खर्च
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही उत्तम पद्धतीने दुग्ध व्यवसाय करीत असताना सुरक्षेबाबत काळजी घेतो. म्हणूनच आम्ही पाच स्तर असलेली आणि सहा रंगांची दूध पिशवी मुंबई आणि पुण्यासाठी वापरतो. अनेकदा डुप्लिकेट पिशव्या तयार करून त्यातून दूधविक्री केली जाते. या पिशव्यांचे डुप्लिकेशन करता येऊ नये यासाठी उपाययोजना केल्यामुळे ही दरवाढ दिसून येत आहे. निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्यासाठीच आता अशी पत्रके काढली जात आहेत.