गोकुळ संचालक ‘अडकले’
By admin | Published: February 22, 2016 01:03 AM2016-02-22T01:03:56+5:302016-02-22T01:04:17+5:30
जाट आंदोलनाचा फटका : हरियाणातील संचारबंदीमुळे २४ तास रस्त्यात
कोल्हापूर : इंडियन डेअरी असोसिएशनच्या परिषदेसाठी हरियाणा येथे गेलेले ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक, अधिकाऱ्यांना जाट आंदोलनाचा फटका बसला आहे.
‘जाट’ आंदोलनामुळे हरियाणात संचारबंदी लागली आहे. त्यामुळे परिषद संपवून कर्नाळ येथून दिल्लीकडे गाडीतून रवाना झालेले संचालक सोनपतजवळ महामार्गावरच अडकले. वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता नव्हती, थंडीही असल्याने संचालकांसह प्रवाशांना रस्त्यावरच रात्र काढावी लागण्याची भीती होती.
रविवारचा दिवस उजाडला तरी वाहतूक सुरळीत झाली नसल्याने काय करायचे, या विवंचनेत संचालक होते. अखेर, नागपूर येथील व हरियाणामध्ये सेवेत असणाऱ्या सीआरएफच्या एका जवानाच्या सहकार्याने दुचाकीवरून संचालकांना कच्च्या रस्त्याने दिल्ली सीमेनजीक आणून सोडले.
रविवारी दुपारी चार वाजता अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, रवींद्र आपटे, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, रामराजे कुपेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, स्वीय सहाय्यक संजय दिंडे हे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. सातच्या विमानाने ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
इंडियन डेअरी असोसिएशनची परिषद दि. १८ ते २० फेबु्रवारीदरम्यान हरियाणा येथे होती. यासाठी ‘गोकुळ’ चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर त्याचबरोबर पश्चिम विभागातून ‘उत्कृष्ट महिला दूध उत्पादिका’ म्हणून देशपातळीवरील आय.डी.ए.चा प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सुरेखा शेगुणशी (नूूल, ता. गडहिंग्लज) व त्यांचे पती सुरेश शेगुणशी आदी दि. १७ फेबु्रवारीला रवाना झाले होते.
त्रासातून हे बचावले
दरम्यान अरुण डोंगळे, विश्वास जाधव, उदय पाटील, राजेश पाटील, अमरिष घाटगे, सत्यजित पाटील, बाबा देसाई हे शुक्रवारीच दिल्लीत पोहोचल्याने आंदोलनाचा फटका बसला नाही.