गोकुळ खासगी मालकांच्या घशात जाऊ द्यायचा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:46+5:302021-04-24T04:25:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : बांबवडे : गोकुळ दूध संघ सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे. तो खासगी मालकांच्या घशात ...
लोकमत न्यूज नेटवर्क :
बांबवडे : गोकुळ दूध संघ सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे. तो खासगी मालकांच्या घशात जाऊ द्यायचा नाही या इराद्यानेच या निवडणुकीला सामोरे जात असून, गोकुळमध्ये आता सत्तांतर अटळ आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
बांबवडे तालुका शाहूवाडी येथे गोकुळ ठरावधारकांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, गेल्या निवडणुकीची व आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीपासून आतापर्यंत संघाच्या हितासाठी नेहमी संघर्षाची भूमिका घेत आलो आहे. आम्ही त्यांचे मल्टिस्टेट करण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचे फळ आता मिळणार आहे. माननीय मुश्रीफ साहेब व आम्ही सत्ताधाऱ्यांचे सर्व मनसुबे यावेळी उधळून लावू व सत्तांतर घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विश्वास पाटील म्हणाले की, शाहूवाडी तालुक्यातील गोगवे शीतकरण केंद्र उभारण्यात माजी आमदार संजीवनी गायकवाड व आनंदराव पाटील यांचे योगदान मोठे आहे. तुमच्या तालुक्यातील उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांच्या पाठीशी राहावे व आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले की, माझी भूमिका ही नेहमी तत्त्वाची आहे. आतापर्यंत सत्ताधारी गट चुकीच्या भूमिकेतून संघ चालवीत होता म्हणून आम्ही त्यांना विरोध केला. शाहूवाडी तालुक्यात गोकुळची ताकद विरोधकांनी राजकीय हितासाठी वापरली आहे. संजयसिंह गायकवाड यांनी तालुक्यासाठी केलेल्या कार्याची पोचपावती कर्णसिंह गायकवाड यांना निश्चितपणे मिळणार आहे. तरी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदान करून सर्व पॅनलच्या विजयासाठी जिवाचे रान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्णसिंह गायकवाड म्हणाले की, शाहूवाडी तालुक्यात मतदारांची संख्या चांगल्या प्रकारे असून, जास्तीत जास्त मतदार हे आघाडीच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही मी देतो.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी बांधकाम व अर्थ सभापती सर्जेराव पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, नावेद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक, अजित नरके, अमरसिंह पाटील, योगीराज गायकवाड, प्रकाश पाटील, अभिजित तायशेटे, एस. आर. पाटील, बाबासो चौगुले, आदी उपस्थित होते.
माजी सभापती पंडितराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर उपसभापती महादेवराव पाटील यांनी आभार मानले.
फोटो : बांबवडे येथे गोकुळ दूध संघाच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री सतेज पाटील. व्यासपीठावर आमदार विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, कर्णसिंह गायकवाड संजीवनी गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.