श्री रामाचा एकेरी उल्लेख: मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवस जाहिरातीवर 'गोकुळ'ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 05:21 PM2022-04-15T17:21:20+5:302022-04-15T17:22:09+5:30
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच यावर गोकुळने स्पष्टिकरण दिले आहे.
कोल्हापूरः ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीत प्रभु श्रीरामांचा एकेरी उल्लेख झाल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. यांचे पडसाद आज, शुक्रवारी उमटले. याप्रकरणी मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुश्रीफ हे जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांचा वाढदिवस रामनवमी दिवसी नसल्याचा पुरावा देखील दिला. यासर्व प्रकारानंतर गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी प्रसिद्धीपत्रकातून हे स्पष्टीकरण दिले आहे. यात म्हटले आहे की, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व अश्या अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या एका निधर्मी वागणुकीच्या मुश्रीफ यांच्या बाबतीत आम्हाला भावलेल्या या वैशिष्टयांचा उल्लेख आम्ही त्यांना देत असलेल्या शुभेच्छा जाहिरातीत केला.
प्रभू श्रीरामचंद्र हे विश्वरुपी दैवत आहे, प्रत्येकाचेच. हिंदूंव्यतिरिक्त इतरही धर्मातील लोक श्रीरामप्रभुंची भक्ती करतात, त्यांना विचारांचा आदर्शही मानतात. मुश्रीफ आपल्या मस्तकी भगवा अष्टगंध लावून श्रीरामप्रभूपुढे नतमस्तक होतात, तर ललाटी अबीर लावून विठुरायांची पालखीही खांद्यावरून अनवाणी चालत वाहतात. हे समस्त जनतेने बघितले आहे. या निधर्मीपणाचे अनेकांना कौतुकच वाटले आहे. एक राजकारणी म्हणून नव्हे; तर राजर्षी शाहू महाराजांच्या निधर्मी करवीर नगरीचं एक निधर्मी नेतृत्व म्हणूनच समस्त जनता त्यांच्याकडे पहाते.
कोल्हापूर ही स्पृश्य, अस्पृश्य, धर्मकांड अश्या समाजद्रोही वृत्तीला थारा न देणारी भूमी आहे. इथे संकुचित मनोवृत्तीला थारा नाही. त्यातून जाहिरात ही एक कला आहे. या कलेतून साकार झालेल्या या जाहिरातीचे अनेकांनी मुक्त मनाने कौतुकही केले आहे. श्रीरामप्रभू विषयी आम्हांला नितांत आदर आणि मनात भक्तीही आहे. या जाहिरातीतून कोणाच्याही धार्मिक किंवा श्रीरामप्रभूशी वैयक्तीक बरोबरी करून भावना दुखावण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलेला नाही असे म्हटले आहे.
परंतु; या जाहिरातीबद्दल काहींनी विनाकारण घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून नामदार मुश्रीफ यांना जो मनस्ताप, त्रास झाला त्याबद्दल व या जाहिरातीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त केली. हे प्रसिद्धीपत्रकावर चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्यासह संचालकांची नावे आहेत.