‘कुंभीं’मध्ये ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडसाद
By Admin | Published: November 30, 2015 11:42 PM2015-11-30T23:42:58+5:302015-12-01T00:13:36+5:30
‘गोकुळ’ इच्छुकांचा नरकेंशी संपर्क : विरोधी गटाकडून लढण्यास ज्येष्ठ नेत्यांची अनिच्छा
प्रकाश पाटील -- कोपार्डे--विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता असणाऱ्या सर्वच दुसऱ्या फळीतील काँग्रेस नेत्यांनी पी. एन. पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते; मात्र यात पी. एन. पाटील यांचा पराभव झाला. तरीही आपल्या कामाची पोचपावती नक्की मिळेल या आशेवर असणाऱ्या जुन्या करवीर मतदारसंघाला पुन्हा डावलत जुन्या सांगरूळ मतदारसंघालाच प्राधान्य देण्यात आल्याने इच्छुक मातब्बर नेत्यांत मोठा असंतोष निर्माण झाला असून, त्याचे पडसाद आता ‘कुंभी’च्या राजकारणातही दिसून येण्याची शक्यता आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी २००९ मध्ये विधानसभा लढवीत पी. एन. पाटील यांचा पराभव केला. यावेळी ‘कुंभी’ची पंचवार्षिक निवडणूक समोर होती. कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणुकीत नरके पॅनेल म्हणजे विजय असे गणित निर्माण झाल्याने, अनेक कार्यकर्त्यांनी २००९ मध्ये
आ. नरकेंच्या विजयासाठी जिवाचे रान केले. यानंतर ‘कुंभी’ची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण केलेल्या कामाचा हिशेब मांडत आपल्याला कुंभीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, असा दबाव आणण्यास सुरुवात केली; मात्र संचालक २५ आणि इच्छुक २०० अशी परिस्थिती झाली. आ. नरके यांचीही कार्यकर्त्यांची समजूत काढताना दमछाक झाली. यातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी आमदार नरकेंच्या विरोधात आॅक्टोबर २०१४ च्या विधानसभेत उटे काढण्यासाठी पी. एन. पाटील यांच्या गोटात प्रवेश करीत अगदी खालच्या पातळीवर जात प्रचाराची राळ उठविली. मात्र, जनतेने आ. नरकेंच्या संपर्काला मान देत त्यांना पुन्हा विजयी केले. नेमकी विधानसभेला जुन्या करवीरमध्ये आ. नरके यांना मदत न करता ‘गोकुळ’ची निवडणूक समोर ठेवून पी. एन. पाटील यांना मदत करणारी बहुतांश मातब्बर यांनी ‘गोकुळ’चे राजकारण समोर ठेवले होते. मात्र, पी. एन. पाटील यांचा पराभव झाला.
जरी करवीरमधील ‘कुंभी’च्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या मोठ्या मतदानाची आघाडी दिली नसली तरी चांगले मताधिक्य पी. एन. पाटील यांना मिळाले. हे समोर ठेवून गोकुळसाठी इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून शक्तिप्रदर्शन करण्यास सुरुवात केली. मात्र, नेहमीचा फॉर्म्युला करवीरमधून गोकुळसाठी उमेदवार निवडीला कायम ठेवला.
जुन्या सांगरूळ मतदारसंघातील जुन्याच चार संचालकांबरोबर बाळासाहेब खाडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गोकुळसाठी इच्छुक असणारे प्रकाश पाटील (कोगे), तुकाराम पाटील (खुपिरे), एस. के. पाटील (कोपार्डे), प्रकाश देसाई (बोरगाव) या नेत्यांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली.
विरोधक नरके यांच्या संपर्कात
सध्या पुंडलिक पाटील यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्याने, तर बाळासाहेब खाडे यांना ‘गोकुळ’ व प्रकाश देसाई हे ‘यशवंत बँकेचे अध्यक्षपद व पॅनेल प्रमुखाची भूमिका बजावणारे असल्याने शाहू आघाडीतून सक्रिय झाले आहेत, तर २०१० च्या कुंभी निवडणुकीत सर्वांत जास्त ११ हजार मतदान घेणारे प्रकाश पाटील, तुकाराम पाटील हे आ. नरकेंच्या संपर्कात आहेत, तर बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीच दाखल केलेली नाही. त्यामुळे विरोधी गटावर ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे पडसाद पडण्याची शक्यता आहे.