‘गोकुळ’ पहिल्यांदाच ‘गडहिंग्लज’शिवाय !
By admin | Published: April 29, 2015 01:01 AM2015-04-29T01:01:45+5:302015-04-29T01:03:12+5:30
दूध उत्पादक चिंतेत : तीन दशकांची परंपरा खंडित
राम मगदूम- गडहिंग्लज -तीन दशकांनंतर पहिल्यांदाच ‘गोकुळ’च्या नव्या सभागृहात गडहिंग्लज तालुक्याचा प्रतिनिधी असणार नाही. ‘गडहिंग्लज’करां- शिवाय गोकुळ, अशी स्थिती तालुक्याच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संस्थाचालक चिंतेत पडले आहेत.
‘गोकुळ’च्या स्थापनेनंतर सर्वप्रथम स्व. कॅप्टन दीपकराव शिंदे यांना शासननियुक्त प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतरच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील-औरनाळकर यांना ‘गडहिंग्लज-आजरा व चंदगड’ या तीन तालुक्यांचा प्रतिनिधी म्हणून या विभागातील सभासदांनी बहुमताने निवडून दिले.
१९८७ मधील निवडणुकीत तत्कालीन विद्यमान संचालक औरनाळकर पाटलांना ऐनवेळी डावलण्यात आले. त्यावेळी महाडिक गटातर्फे राजकुमार हत्तरकी, तर कुपेकर गटातर्फे तानाजीराव मोकाशी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्याला ‘गोकुळ’चे दोन संचालक मिळाले. तो एकमेव अपवाद वगळता त्यानंतर नेहमी एकच जागा मिळाली.
१९८७ ते २०१३ अखेर सलग २५ वर्षे स्व. हत्तरकी यांचीच त्या जागेवर पकड राहिली. दोनवेळा ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची संधीदेखील त्यांना मिळाली. तथापि, स्व. हत्तरकींच्या पश्चात खूप प्रयासानंतर सत्तारूढ पॅनेलमधून उमेदवारी मिळूनदेखील त्यांचे सुपुत्र सदानंदाचा ‘गोकुळ’ प्रवेश होऊ शकला नाही.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत झालेल्या क्रॉस व्होटींगचा आणि नेहमी स्व. हत्तरकींच्याबरोबर राहिलेले भैरू पाटील-वाघराळकर व अॅड. बाळासाहेब पाटील ही तालुक्यातील प्रमुख मंडळी यावेळी विरोधी पॅनेलमध्ये सहभागी झाल्याचा फटका बसला. स्वकियांची मते मुठीत ठेवून विरोधकांचीही मते मिळविण्याची
स्व. हत्तरकींची ‘हातोटी’ सदानंदांना जमली नाही. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला.
आमदार महाडिक यांचे विश्वासू सहकारी आणि ज्येष्ठ संचालक म्हणून स्व. हत्तरकींचा गोकुळमध्ये दबदबा होता.
हत्तरकींचा तालुका म्हणून ‘गोकुळ’मध्ये गडहिंग्लजकरांची कामे व्हायची. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते सर्वांनाच मदत करायचे. त्यामुळेच सलग २५ वर्षे त्यांचे संचालकपद अबाधित राहिले. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या गटाबरोबरच गडहिंग्लजकरांना ‘गोकुळ’ दूरच राहिले.
गडहिंग्लजला चिलिंग सेंटर; दूध उत्पादनातही आघाडी
लिंगनूर काा नूल येथे गोकुळचे चिलिंग सेंटर आहे. दूध उत्पादनातही गडहिंग्लज तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. मात्र, नव्या संचालक मंडळात ‘गडहिंग्लज’चा प्रतिनिधी नसल्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्थांना सेवा व न्याय कसा मिळणार? याची तालुक्यात चर्चा आहे.