गोकुळ’ला मुंबई येथे पॅकिंगसाठी मिळाली स्वत:ची जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:28 AM2021-08-27T04:28:26+5:302021-08-27T04:28:26+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने मुंबईत वाशी येथे असलेल्या प्रकल्पाशेजारील जागा अखेर खरेदी ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने मुंबईत वाशी येथे असलेल्या प्रकल्पाशेजारील जागा अखेर खरेदी केली आहे. येथे मुंबईसाठी लागणाऱ्या ११ लाख लिटर दुधाचे पॅकिंग व स्टोअरेज होणार आहे. गुरुवारी गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भूमिपूजन करून मुंबईत विस्ताराचे तब्बल २५ वर्षांपासूनच्या स्वप्नांची पूर्तता केली.
गोकुळमध्ये सत्तांतर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईतील विस्ताराकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यासंदर्भात वारंवार बैठकाही झाल्या. स्वत: पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याकामाी पुढाकार घेत सध्या वाशी येथे असलेल्या प्रकल्पाला लागून असलेली रिकामी जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर ही जागा गोकुळच्या ताब्यात आली आहे.
मुंबईत गोकुळ दूध संघाचे रोज ११ लाखांवर वितरण आहे, पण स्वत:चे पॅकिंग युनिट नसल्याने जादा पैसे देऊन बाहेरून ते करून घ्यावे लागत होते. त्यामुळे गोकुळला जास्तीचे पैसे मोजावे लागत हाेते. पॅकिंग व स्टोअरेजला भाड्यापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतून स्वत:ची इमारत उभी राहिली असती, पण आजपर्यंत त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. गोकुळमध्ये ३० वर्षांनंतर झालेल्या सत्तांतरामुळे या स्वमालकीच्या पॅकिंगचा मुद्दा वेगाने पुढे आला आणि तो यशस्वीपणे निकालातही निघाला.
मुंबईत झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी. ही. घाणेकर, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील, रामकृष्ण पाटील, पृथ्वीराज पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
२५ वर्षांचा असाही योगायोग
गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांनी १९९६ मध्ये मुंबईतील वाशी येथे गोकुळ दूध संघासाठी जागा खरेदी केली. आता तेथूनच दूध वितरणाचे काम होते. आता बरोबर २५ वर्षांनी त्याला लागून असलेली जागा खरेदी करून गोकुळचा डबल विस्तार केला आहे. आणखी योगायोग म्हणजे १९९६ मध्ये ही जागा खरेदी करताना विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील हे चुयेकरांसमवेत मुंबईला उपस्थित होते. आता बरोबर २५ वर्षांनी त्याच जागेला लागून असलेली जागा खरेदी करण्यासह त्याचे भूमिपूजन करण्याच्या कामाचेही साक्षीदार विश्वास पाटीलच ठरले आहेत.
चौकट
नवी मुंबई, वाशी येथील दालचा फूड प्रोसेसिंग प्रा. लि., यांची जागा ताब्यात आल्यानंतर आता पॅकिंग युनिट व कोल्डस्टोअरेजची उभारणी वेगाने होणार आहे. पॅकिंगचा अतिरिक्त दर, टॅक्स, व्यवस्थापन हे सर्व आता एकाच छताखाली करता येणार आहे. शिवाय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागणार नाही.
विश्वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ दूध संघ
फोटो : २६०८२०२१-कोल- गोकूळ
फोटो ओळ : नवी मुंबई येथे गोकुळ दूध संघाच्या नवीन जागेचे पूजन अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील, रामकृष्ण पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत झाले.