Kolhapur: ‘गोकुळ’ने केली संस्था व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:07 PM2024-01-22T14:07:57+5:302024-01-22T14:08:12+5:30
म्हैस दुधालाच मिळणार प्रतिलिटर १० ते २५ पैसे : वासाच्या दूध खरेदीतही वाढ
राजाराम लोंढे
कोल्हापूर : म्हैस दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘गोकुळ’ दूध संघाने प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ केली आहे. ही वाढ केवळ म्हैस दुधालाच व ज्यांचे १०० लिटरपेक्षा अधिक म्हैस दूध संकलन आहे, अशा संस्थांना प्रतिलिटर १० ते २५ पैशांपर्यंत ही वाढ मिळणार आहे.
‘गोकुळ’च्या म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण, मागणी आणि उत्पादन यात तफावत असल्याने म्हैस दूध वाढीसाठी संघाचे प्रयत्न सुरू आहेत. संघाने १७ लाख ५० हजार लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला. यामध्ये जवळपास ९ लाख २५ हजार लिटर म्हशीचे दूध आहे. आगामी वर्षभरात प्रतिदिनी २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करायचा आहे, त्यादृष्टीने संचालक मंडळाने कंबर कसली आहे.
म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्वाधिक दूध खरेदी दराबरोबरच परराज्यातील म्हैस खरेदीसाठी ४० हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ केली. उत्पादकांबरोबरच आता, दूध संस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी व्यवस्थापन खर्चात वाढ केली आहे.
वासाच्या म्हैस दुधाला प्रतिलिटर ४ व गायीच्या दुधाला २ रुपये दिले जात होते. पण, यामुळे संस्था अडचणीत येतात. यासाठी त्यामध्ये वाढ करून अनुक्रमे ६ व ४ रुपये देण्यात येणार आहेत.
स्थानिक विक्रीमुळे संस्थांच्या अडचणी
‘गोकुळ’शी संलग्न दूध संस्थांकडून गवळी विक्री बंद करण्यात आली आहे. मात्र, ज्यांची जनावरे नाहीत अथवा गाभण आहेत, अशांना स्थानिक दूध विक्री करावी लागते. साधारणत: ५पासून ४० लिटरपर्यंत म्हैस दुधाची विक्री होते. ज्यांचे म्हैस दुधाचे संकलन कमी आहे, स्थानिक विक्रीमुळे १०० लिटरपेक्षा कमी दूध ‘गोकुळ’ला जाते, अशा संस्थांना फटका बसणार आहे.
दुर्गम तालुक्यातील संस्थांवर अन्याय
गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, भुदरगड यांसारख्या दुर्गम तालुक्यातील वाड्यावस्त्या आणि लहान गावात गाय व म्हैस मिळून १०० लिटर दूध संकलन होत नाही. ‘गोकुळ’शी संलग्न ५,८०० संस्थांपैकी अशा संस्थांची संख्या २ हजारपेक्षा अधिक आहे. संघाच्या या धोरणाचा त्यांच्यावर अन्याय होणार आहे.
असे मिळणार वाढीव अनुदान -
संकलन, प्रतिदिन सध्याचे अनुदान एकूण मिळणारे अनुदान
१०० ते २०० लिटर ६० पैसे ७० पैसे
२०१ ते ३०० लिटर ६० पैसे ७५ पैसे
३०१ ते ५०० लिटर ६० पैसे ८० पैसे
५०१पेक्षा अधिक ६० पैसे ८५ पैसे