‘गोकुळ’बी जिंकलंय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:41 AM2021-05-05T04:41:49+5:302021-05-05T04:41:49+5:30

(सतेज पाटील व मुश्रीफ, महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांचा फोटो वापरावा.) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रातील दूध ...

Gokul has won! | ‘गोकुळ’बी जिंकलंय !

‘गोकुळ’बी जिंकलंय !

Next

(सतेज पाटील व मुश्रीफ, महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांचा फोटो वापरावा.)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्रातील दूध व्यवसायाचे व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीत गेल्या पाच दशकांच्या वाटचालीत प्रथमच सत्तांतर झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय... आता गोकुळ उरलंय’ अशी घोषणा दिली होती. ही सत्ताही हस्तगत करण्यात त्यांना यश आले. मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये मंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. सत्तारूढ आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गेल्या ३० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. कोविडच्या कारणावरून निवडणूक घ्यावी की नको यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली. ही निवडणूक घेऊन व ती जिंकून मंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपणच किंग असल्याचे दाखवून दिले. राज्यातील सत्तेचाही या विजयासाठी हातभार लागला आहे. विरोधी आघाडी महाविकास आघाडी म्हणूनच रिंगणात उतरली होती. सत्तारूढ आघाडीला भाजपने पाठिंबा दिला होता.

सुमारे चोवीसशे कोटींची उलाढाल, पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जगण्याशी जोडलेला व देशभर दर्जेदार दुधाचा ब्रँड म्हणून विकसित झालेल्या ‘गोकुळ’ची निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल असे चित्र होते; परंतु निकालानंतर विरोधी आघाडीने तसा एकतर्फी विजय मिळविल्याचे स्पष्ट झाले. उत्पादकांना दोन रुपये लिटरला जास्त दर देण्याची ग्वाही, महाडिक यांची संघातील दूध वाहतुकीची टँकर लॉबी मोडून काढण्याचे आश्वासन व ‘अमूल’च्या धर्तीवर ‘गोकुळ’चाही विस्तार करणार हे मुद्दे विरोधी आघाडीने चर्चेत आणले. त्याला ठरावधारक मतदारांनी पाठबळ दिले आहे. संघाचा पारदर्शी कारभार, विरोधकांची टोळी संघाची बसलेली घडी विस्कटून टाकेल असा प्रचार सत्तारूढ आघाडीने केला तरी तो मतांत परिवर्तन करण्यात सत्तारूढ आघाडीला यश आले नाही. महाडिक कुटुंबीयांचा विधान परिषद, लोकसभा व विधानसभेलाही पराभव झाला. ‘गोकुळ’ची सत्ता ही महाडिक यांची राजकारणावर मांड ठेवण्याची आर्थिक ताकद होती. तीच या निवडणुकीत उद‌्ध्वस्त झाली आहे.

विद्यमान अध्यक्षांच्या पराभवाची परंपरा कायम

सत्तारूढ आघाडीचे उमेदवार व संघाचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांचा दारुण पराभव झाला. त्यांची प्रकृती बरी नसल्याने यंत्रणा राबविण्यात मर्यादा आल्या. सत्तारूढ आघाडीने ज्येष्ठ संचालक व पॅनेलचा चेहरा म्हणून त्यांना रिंगणात उतरविले होते. त्यांच्यासह सत्तारूढ आघाडीतील ११ विद्यमान संचालकही पराभूत झाले. त्यामध्ये माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचा मुलगा दीपक, माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा धैर्यशील, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या मातोश्री अनुराधा पाटील, ज्येष्ठ संचालक रणजित पाटील-मुरगूडकर या प्रमुखांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत दिलीप पाटील (शिरोळ) यांचा पराभव झाला होता.

सतेज-मुश्रीफ-कोरे पॅटर्न

ठरावीक मतदार असलेल्या निवडणुका जिंकण्यात मंत्री सतेज पाटील, -मंत्री हसन मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांची राजकारणात गट्टी आहे. त्याचे प्रत्यंतर या निवडणुकीतही आले. यापूर्वी महापालिका, विधान परिषद, बाजार समिती, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी सत्ता काबीज केली आहे.

तब्बल साडेबारा तास चालली मतमोजणी

कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मंगळवारी सकाळी आठपासून मतमोजणीस सुरुवात झाली. सकाळी साडेदहाला मतांचे वर्गीकरण पूर्ण झाले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता सर्वसाधारण गटातील निकाल पूर्ण झाला.

‘बाजीराव’ यांच्यामुळे ‘बाळासाहेबांचा’ विजयी सोपा

सत्ताधारी चारपैकी तीन संचालकांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. मात्र बाळासाहेब खाडे यांच्या सामान्य कार्यकर्त्याने मुसंडी मारली. यामध्ये त्यांचे बंधू अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव बाजीराव खाडे यांचे नियोजन, ‘कुंभी बचाव’ व कॉंग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात बांधलेली मोट या सर्वांचा फायदा बाळासाहेब खाडे यांना विजयापर्यंत घेऊन गेला.

‘मागासवर्गीय, ओबीसी, भटक्या जाती’ गटाचा पहिला निकाल

राखीव गटातील पाचपैकी मागासवर्गीय, ओबीसी, भटक्या जाती या जागांचा निकाल पहिल्यांदा लागला. महिला गटात विजयासाठी जोरदार चुरस पाहावयास मिळाली.

क्रॉस व्होटिंगने सत्ताधाऱ्यांच्या आशा पल्लवित

राखीव गटातील चार जागांचा मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर सत्ताधारी गट काहीसा अस्वस्थ होता. त्यांचे उमेदवार केंद्राबाहेर पडले; मात्र सर्वसाधारण गटातील मोजणीवेळी क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यानंतर सत्ताधारी गटाच्या आशा पल्लवित झाल्या.

सतीश पाटील यांना उमेदवारी डावलल्याचा फटका

विरोधी आघाडीतून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र ऐनवेळी त्यांना डावलून महाबळेश्वर चौगुले यांना उमेदवारी दिली. त्याचा फटका चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतील उमेदवारांना बसल्याची चर्चा सुरू होती.

पहिल्या फेरीपासूनच खाडे, घाटगे, नरके आघाडीवर

पहिल्या फेरीपासून सत्तारूढ गटाचे बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे व चेतन नरके आघाडीवर राहिले. त्यानंतर दुसऱ्या फेरीला उदय पाटील-सडोलीकरही आघाडीवर राहिले. मात्र खाडे, घाटगे व नरके हे शेवटपर्यंत पहिल्या सोळा क्रमांकांत राहिले.

नावडकरांचे नेटके नियोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक तहसीलदार शरद पाटील, डॉ. गजेंद्र देशमुख यांनी मतमोजणीचे नेटके नियोजन केले होते. कर्मचाऱ्यांसाठी फेसशिल्ड, मास्क, हॅण्डग्लाेव्हजचा वापर करण्यात आला होता. एकूणच मतमोजणी प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली.

Web Title: Gokul has won!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.