गोकुळ : महादेवराव महाडिक यांचा संघातील प्रवेश नरके यांच्या बोटाला धरूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:22 PM2018-10-05T14:22:59+5:302018-10-05T14:45:14+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत मल्टिस्टेट ठरावास आक्रमकपणे विरोध करून शिवसेनेचे आमदार चंद्रदिप नरके हे हिरो ठरले असले तरी त्यांचेच काका व संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या बोटाला धरूनच माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा संघातील प्रवेश झाला आहे. तेव्हापासून गेली तीस वर्षे महाडिक या संस्थेवर कब्जा करून आहेत.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत मल्टिस्टेट ठरावास आक्रमकपणे विरोध करून शिवसेनेचे आमदार चंद्रदिप नरके हे हिरो ठरले असले तरी त्यांचेच काका व संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या बोटाला धरूनच माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा संघातील प्रवेश झाला आहे. तेव्हापासून गेली तीस वर्षे महाडिक या संस्थेवर कब्जा करून आहेत.
गोकुळ दूध संघाचा जन्म हा करवीर तालुका दूध संघातून झाला आहे. सहकारातील ज्येष्ठ कार्यकर्ते एन. टी. सरनाईक यांनी १६ मार्च १९६३ ला या संघांची स्थापना केली. कणेरीचे एस.वाय.पाटील त्या संघाचे कार्यकारी संचालक होते. या संघाचे कार्यालय दसरा चौकातून व्हिनस चौकाकडे जाताना लक्ष्मी पेट्रोल पंपाच्या शेजारील इमारतीत आजही आहे. सरनाईक हे राजाराम महाराज यांच्या मंत्रिमंडळात पुरवठा मंत्री होते. ते फार दूरदृष्टीचे नेते होते. पुढे याच करवीर तालुका संघाचे मिल्क फेडरेशन झाले.
साधारणत: १९६७ च्या सुमारास संघात दिवंगत नेते आनंदराव पाटील चुयेकर यांचा प्रवेश झाला. पुढे १९७० ला तेच अध्यक्ष झाले. त्यांनी एका तालुक्यापुरता मर्यादित असलेल्या या संघाचे कार्यक्षेत्र जिल्हाभर वाढविले. त्यांना दूध धंद्याचे गमक सापडले होते. त्यामुळे चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली संघाची वाटचाल दमदारपणे सुरु झाली.
पुढे राष्ट्रीय दूग्धविकास मंडळाशी त्रिस्तरीय करार होवून १ एप्रिल १९७८ ला दूध महापूर योजना सुरु झाली आणि संघाचा विस्तार झाला. आता जिथे संघाचे मुख्यालय आहे तिथे सरकारी डेअरी होती. डॉक यार्ड होते. जिल्ह्यांतून दूध संकलन करून ते मिरजेला पाठविले जाई. व मिरजेतून ते मुंबईला पाठविले जाई. तिथे ‘आरे’ या ब्रॅन्डनेमने ते विकले जाई. चुयेकर यांच्या प्रयत्नांतून सरकारी डेअरीही जिल्हा संघात विलीन झाल्यामुळे ताराबाई पार्कातील जागा गोकुळला मिळाली.
गोकुळच्या माध्यमातून चुयेकर यांचा जिल्ह्याच्या राजकारणातही दबदबा तयार झाला. सहकारातील एक चांगला कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली व त्यातून त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला धुमारे फुटले. त्यातून त्यांनी एक मोठी उडी घेतली व तत्कालीन सांगरुळ विधानसभा मतदार संघातून १९९० च्या निवडणूकीत अपक्ष म्हणून चक्क तत्कालीन बडे नेते श्रीपतराव बोंद्रे यांनाच आव्हान दिले. त्यावेळी शेकापक्षाचे लढाऊ नेते गोविंदराव कलिकते हे विद्यमान आमदार होते. तिरंगी लढत झाली, त्यात बोंद्रेदादा मोठ्या फरकाने विजयी झाले. परंतू त्याचा राग म्हणून चुयेकर यांना अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले आणि संघाची सुत्रे अरुण नरके यांच्याकडे आली.
गंमत बघा, त्याच्याअगोदर म्हणजे १९८६-८७ च्या दरम्यान हेच महादेवराव महाडिक आपल्या पिवळ््या स्कूटरवरून आनंदराव पाटील चुयेकर यांची भेट घेण्यासाठी चुये (ता.करवीर) येथे जात असत. त्या गावांतील अनेक लोकांना ते आजही आठवते. मला दूध वाहतूकीचा सगळा ठेका द्या असा महाडिक यांचा आग्रह होता परंतू त्यास चुयेकर तयार नव्हते. सगळे मी तुमचे ऐकणार नाही व मला इतर कार्यकर्त्यांनाही ही संधी द्यायला हवी असे चुयेकर यांचे म्हणणे होते.
संघात महाडिक यांना पहिल्यांदा रोखण्याचे काम चुयेकर यांनी केले होते. परंतू त्याच चुयेकर यांना अध्यक्षपदावरून हलवून संघाची सुत्रे अरुण नरके यांच्याकडे आली तेथून पुढे सलग दहा वर्षे ते संघाचे अध्यक्ष राहिले. या काळातच महाडिक संघाचे नेते बनले. संघातील सगळा व्यवहार त्यांच्या हातात आला. संघात संचालक मंडळ जरी कार्यरत असले तरी तिथे होणाऱ्या प्रत्येक निर्णयात महाडिक यांचा सहभाग असतो.
गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत उजळाईवाडी मतदारसंघातून सरिता शशीकांत खोत यांना घाटगे गटाने अंतर्गत मदत केल्याने खोत विजयी झाल्या. त्याचा परिणाम म्हणून महाडिक यांनी घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांचे दूध टँकरला लगेच ब्रेक लावला. संघातील सत्तेचा वापर असा काटा काढण्यासाठीही होतो. एकटे महाडिक संघाचे कधीच नेते नव्हते व नाहीत. त्यांना त्या त्या परिस्थितीत कुठल्यातरी राजकीय नेत्याने,पक्षाने मदत केली आणि त्यातून महाडिक यांनी सत्तेवरील मांड कायम ठेवली. म्हणजे अगदी शेकापक्ष,जनता दल यासारखे पक्षही गोकुळमधील सत्तेच्या वाटणीसाठी त्यांच्या मांडवाखालून गेले आहेत.
लोकसभा व विधानसभेतील मदतीची उतराई म्हणून एकदा सदाशिवराव मंडलिक तर एकदा हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या सत्तेला बळ दिले. आता पी.एन.पाटील त्यांच्यासोबत आहेत. विधानसभेला महाडिक गटाने पी.एन. पाटील यांना कधीच प्रामाणिक मदत केलेली नाही. परंतू तरीही तेच पी.एन. आज महाडिक यांच्या सोबत आहेत. कारण गोकुळ ही एकमेव आर्थिक ताकद असलेली सत्ता आता त्यांच्या हातात आहे.
आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ हे गोकुळचे नेतृत्व पी.एन.पाटील यांनी करावे असे म्हणतात. किंवा दोन्ही काँग्रेसमध्ये असाही मोठा प्रवाह आहे की पी.एन. यांच्याकडेच गोकुळची एकहाती सत्ता द्यावी. परंतू सतेज पाटील हे आपल्याकडे सत्ता ठेवू देतील का याबाबत पी.एन.पाटील यांच्या मनांत अविश्र्वासाचे वातावरण आहे. त्याच्या उलट महाडिक यांचा अनुभव आहे.अगदी बरोबरीचा नसला तरी पी.एन.यांनाही तितकाच गोकुळच्या सत्तेचा वाटा मिळतो. त्यामुळेच पक्षीय बंध विसरूनही ते महाडिक यांना बळ देत आले आहेत.
ब्रेक गेला..
संघाच्या कारभारात आनंदराव पाटील चुयेकर म्हणजे ब्रेक सिस्टम होती. तिथे कांही गैर घडू लागले तर त्याला ते विरोध करत असत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संघाच्या संचालक मंडळात १५९ ठरावाना लेखी विरोध केला होता. आताही ते हयात असते तर त्यांनी मल्टिस्टेटला थेट विरोध केला असता. अरुण नरके यांनी पुतण्या चंद्रदिप नरके यांना मोर्चा काढायलाही बळ दिले आणि ते स्वत: मात्र मल्टिस्टेटच्या बाजूने आहेत. हा दुटप्पीपणा त्यांनी कधीच केला नसता.