‘गोकुळ’च्या सभेचा निर्णय सहकार न्यायालयातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:49 IST2017-10-13T22:43:52+5:302017-10-13T22:49:47+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेबाबत सहायक निबंधक (दुग्ध) यांनी विभागीय उपनिबंधकांकडे पाठविला आहे.

‘गोकुळ’च्या सभेचा निर्णय सहकार न्यायालयातच
लोकमत न्यूजनेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेबाबत सहायक निबंधक (दुग्ध) यांनी विभागीय उपनिबंधकांकडे पाठविला आहे. त्यामध्ये संघाच्या प्रोसेडिंगमध्ये विषयांचे वाचन विश्वास पाटील यांनीच केल्याचे म्हटले आहे. सहकार ‘कलम ९२’नुसार सभेच्या संचलनाबाबतचा निर्णय सहकार न्यायालयच घेऊ शकते. त्यामुळे सभेचे भवितव्य आता न्यायालयात ठरणार आहे. उर्वरित तक्रारींतील मुद्द्यांबाबत विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर निर्णय घेणार आहेत.
‘गोकुळ’च्या सभेबाबत आमदार सतेज पाटील यांच्यासह काही दूध संस्थांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. संघाच्या पोटनियमाला धरून सभेचा कामकाज झाले नसल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी सभेच्या कामकाजाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांनी चौकशी करून अहवाल सुनील शिरापूरकर यांच्याकडे पाठविला आहे.
चौकशीमध्ये एकूण आठ वेगवेगळे मुद्दे आहेत. सर्वसाधारण सभा नोटीस, सभेचे प्रत्यक्ष कामकाज याबाबतचा अहवाल त्यांनी दिला आहे. संघ व्यवस्थापनाने लिहिलेले प्रोसेडिंगनुसार विषयपत्रिकेचे वाचन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. इतर मुद्द्यांबाबत ही त्यांनी अहवाल दिला असून त्याचा अभ्यास करून शिरापूरकर अंतिम निकाल देणार आहेत. आठपैकी सभेचे संचलन कसे झाले याबाबत ‘कलम ९१’नुसार सहकार न्यायालयात दाद मागावी लागते. उर्वरित मुद्द्यांबाबत उपनिबंधक निर्णय देणार आहेत.
एका सभेचे कामकाज चार कलमानुसार
सभेची नोटीस कधी, कशी काढली याबाबत सहकार कलम ७५ (१ ते ४) मध्ये मार्गदर्शन दिले आहे. कलम ६० (३) मध्ये सभेतील विषय कसे हाताळावेत हे सांगितले आहे. या दोन्ही कलमांनुसार जर सभा झाली नाही तर कलम ७५(५)नुसार कारवाई करण्याचे अधिकारी निबंधकांना आहेत. सभेचे संचलन कसे झाले. याबाबत ‘कलम ९१’मध्ये मार्गदर्शन केले आहे.