Kolhapur News: अमूल पाठोपाठ ‘गोकुळ’च्या दूध दरातही वाढ; प्रतिलिटरला आता 'इतके' रुपये मोजावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 11:33 AM2023-02-11T11:33:33+5:302023-02-11T11:34:10+5:30
संपूर्ण देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) म्हैस व गाय दूध आज, शनिवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी महागले आहे. मुंबई व पुण्यात म्हैस दुधासाठी प्रतिलिटर ७२ तर कोल्हापुरात ६६ रुपये मोजावे लागणार आहेत. गाय दुधाचे दर अनुक्रमे ५६ व ५० रुपये राहणार आहेत. विक्रीबरोबरच खरेदी दरातही वाढ केली जाणार असून दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
संपूर्ण देशात दुधाची टंचाई भासू लागल्याने गेल्या वर्षभरात दुधाच्या दरात प्रतिलिटर दहा रुपयांची वाढ झाली आहे. दुधाची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत वाढत असल्याने सगळीकडेच दुधाची टंचाई भासत आहे. त्यात तोंडावर उन्हाळा सुरू असल्याने उत्पादनात थोडी घट होऊन मागणी वाढणार आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वच दूध संघांनी पाच- सहा दिवसांपूर्वी दुधाच्या खरेदी व विक्री दरात वाढ केली होती. त्यामुळे ‘गोकुळ’च्या पातळीवर दरवाढीबाबत हालचाली सुरू होत्या. त्यानुसार म्हैस व गाय विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.
खरेदी दरात तीन रुपयांची वाढ शक्य
विक्री दरात दोन रुपयांची वाढ केल्यानंतर खरेदी दरात तेवढीच वाढ करण्याबाबत ‘गोकुळ’च्या पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र, तीन रुपये वाढ करून उत्पादकांना खूश करण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापन करण्याची शक्यता आहे.
असा राहणार विक्रीचा दर, प्रतिलिटर -
दूध - मुंबई - पुणे - कोल्हापूर
म्हैस ७२ ७२ ६६
गाय ५६ ५६ ५०
इतर दूध संघांनी विक्री दरात वाढ केल्याने ‘गोकुळ’नेही निर्णय घेतला. खरेदीचा दरही वाढवला जाईल, याबाबत दोन दिवसांत संचालक मंडळात निर्णय घेऊ. - विश्वास पाटील, अध्यक्ष, गोकुळ