Gokul Milk Election -माझा पराभव झाला नाही, तो केला गेला : वीरेंद्र मंडलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:29 PM2021-05-07T16:29:03+5:302021-05-07T16:30:56+5:30
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माझा पराभव झाला नसून, तो केला गेल्याची सल पराभूत उमेदवार वीरेंद्र संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मंडलिक आहोत, आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं आहे आणि संघर्ष तर आमच्या कुंडलीतच आहे. मी पुन्हा उठून उभा राहीन, लढत राहीन, अशा आशावादही त्यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माझा पराभव झाला नसून, तो केला गेल्याची सल पराभूत उमेदवार वीरेंद्र संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मंडलिक आहोत, आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं आहे आणि संघर्ष तर आमच्या कुंडलीतच आहे. मी पुन्हा उठून उभा राहीन, लढत राहीन, अशा आशावादही त्यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.
मंडलिक विरोधी आघाडीचे उमेदवार होते. एकाच कुटुंबातील दोन उमेदवार रिंगणात होते. त्याशिवाय दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला महालक्ष्मी दूध संघ बंद पडल्याबाबतची नाराजीही वीरेंद्र यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. परंतु त्याशिवायही कागल तालुक्यातून त्यांना वगळून सत्तारूढ गटाला उमेदवारास मतदान झाल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या पोस्टला महत्त्व आले आहे.
वीरेंद्र या पोस्टमध्ये म्हणतात, माझे आजोबा सदाशिवराव मंडलिक व वडाचे झाड यांचं फार जुनं नातं आहे. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे, 'हे वडाचे झाड माझा गुरू आहे. या झाडाने मला बरंच काही शिकवलं. माझ्या सुरुवातीच्या निवडणुकीचे चिन्ह वडाचे झाड आणि माझं आयुष्य सुद्धा या वडाच्या झाडाप्रमाणेच.' वडाच्या झाडाच्या छायेखाली अनेकांना सावली मिळते, तसंच आयुष्य माझ्या आजोबांचं होतं.
दिवंगत मंडलिक यांनाही त्यांच्या आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळाले नाही. माझे वडील संजय मंडलिक यांनाही २००० ते २०१९ पर्यंत आयुष्यात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांच्याविरुद्ध बोट ठेवायला काही नाही, म्हणून आमचा महालक्ष्मी दूध संघ अडचणीत आणला. स्वतः सात वाजल्यानंतर काही करो, पण माझ्या वडिलांवर खोटेनाटे आरोप झाले तरी आम्ही खचलो नाही आणि मी देखील गोकुळच्या निवडणुकीतील पराभवाने खचणार नाही.