मुंबईतील जागाच ‘गोकुळ’ दुधाच्या घुसळणीचे कारण -‘गोकुळ’ अध्यक्ष पदाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 01:19 AM2018-12-30T01:19:33+5:302018-12-30T01:22:42+5:30
गेले अनेक वर्षे गुण्यागोविंदाने ‘गोकुळ’मध्ये रमणाऱ्या संचालकांमध्ये एकदम असंतोष कसा उफाळून आला? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा लांबण्यामागे मुंबईतील जागा
कोल्हापूर : गेले अनेक वर्षे गुण्यागोविंदाने ‘गोकुळ’मध्ये रमणाऱ्या संचालकांमध्ये एकदम असंतोष कसा उफाळून आला? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. अध्यक्ष विश्वास पाटील यांचा राजीनामा लांबण्यामागे मुंबईतील जागा खरेदीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. वाशी येथे दूध प्रकल्प व पॅकिंग सेंटरसाठी चौदा एकर जागा १७० कोटीला खरेदी केली जाणार असून, हा व्यवहार आपल्याच कालावधीत व्हावा, यासाठी पाटील यांच्यासह काही संचालकांचा प्रयत्न आहे.
‘गोकुळ’ हे जिल्ह्याच्या राजकारणाचे सत्ता केंद्र असल्याने येथील वर्चस्वाला महत्त्व आहेच; पण त्याच्या पोटात दुसरी अनेक कारणे दडली आहेत. संघाचे नेतृत्व जरी महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील हे करीत असले तरी यामध्ये प्रत्येक तालुक्यातील नेते सहभागी आहेत. गेले अनेक वर्षे या दोन नेत्यांची सत्ता आहे. रोटेशननुसार दर दोन वर्षांनी अध्यक्ष बदल यासह इतर बाबतीतही नेत्यांची एकवाक्यता राहिली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या दुधात अंतर्गत कितीही घुसळण झाली तर ती बाहेर येत नव्हती. यावेळेला अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून संचालकांत धुसफूस सुरू झाली, राजीनामा देत नाही असे झाल्यानंतर धुसफुसीचे अंतर्गत वादात रूपांतर झाले आणि सगळे प्रकरण बाहेर पडले. साडेतीन वर्षे झाल्याने विश्वास पाटील यांनी राजीनामा द्यावा, असा आग्रह ज्येष्ठ संचालकांचा आहे. पाटीलही राजीनामा देण्यास तयार आहेत; पण मुंबईतील जागेचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देऊ, असा त्यांचा सुरुवातीपासूनच ठेका होता. त्याला संचालकांचा विशेषत: ज्येष्ठ संचालकांचा आक्षेप राहिला आणि त्यांनी मागील बैठकीला विषयच हाणून पाडल्यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले.
विश्वासात न घेताच जागा खरेदीचा प्रयत्न
संघात कोणताही निर्णय घेताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊनच तो मंजूर केला जातो. पण, मुंबईतील जागा खरेदीत संचालकांना विचारले नसल्याचा आरोप होत आहे. अध्यक्ष पाटील यांनी परस्पर बोलणी करून थेट संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवल्याने संचालक संतप्त झाले.
पेल्यातीलच वादळ ठरणार?
महाडिक व पी. एन. पाटील या दोघांना एकमेकापासून दूर करण्याचा प्रयत्न झाला, पण किमान ‘गोकुळ’च्या सत्तेपुरते का असेना एकसंध राहिले. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत तर महाडिक व पाटील एकमेकांच्या विरोधात होते, त्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होईल, असा विरोधकांचा अंदाज होता. ‘गोकुळ’ दुधाच्या ताकदीने दोघांना पुन्हा घट्ट बांधले. आता अध्यक्ष निवडीवरून दोन गट पडले असले तरी हे पेल्यातीलच वादळ ठरणार हे मात्र निश्चित आहे.
मंगळवारी राजीनामा शक्य
जागा खरेदीचे प्रकरण चिघळल्याने आता राजीनामा लांबविला जाणार नाही. मंगळवारी (दि. १) अध्यक्ष पाटील राजीनामा कार्यकारी संचालकांकडे देण्याची शक्यता असून, तो शुक्रवार (दि. ४)च्या बैठकीला ठेवून मंजूर केला जाईल.