‘गोकुळ’ मल्टिस्टेट प्रस्ताव रद्दवर अखेर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:18 PM2019-11-14T13:18:40+5:302019-11-14T13:20:21+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करत तो मागे घेण्यावर अखेर बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वसाधारण सभेपूर्वी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर गरजेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
‘गोकुळ’ मल्टिस्टेटच्या ठरावावरून गेले वर्षभर जिल्ह्याचे राजकारण धूमसत आहे. लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटले. संघाची मागील सर्वसाधारण सभा या विषयावरून वादळी झाली तरीही संचालक मंडळाने महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची परवानगी घेऊन प्रस्ताव केंद्रीय निबंधकांकडे पाठविला होता; पण ३० आॅक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित करून जाब विचारण्याची तयारी विरोधकांनी केली होती.
अखेर सभेच्या अगोदर दोन दिवस अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी दूध उत्पादकांची भावना लक्षात घेऊन मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. सर्वसाधारण सभेतही त्यांनी तसे जाहीर केले आणि बुधवारच्या संचालक मंडळाच्या सभेत हा विषय चर्चेला ठेवला. त्यावर बुधवारी सविस्तर चर्चा होऊन अध्यक्ष आपटे यांनी दिलेल्या पत्रास मान्यता देण्यात आली.
संचालक मंडळाची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे आगामी काळात रिक्त होणाऱ्या जागांचा अंदाज घेऊन गरजेनुसार नोकरभरती करण्याबाबतही चर्चा झाली.
माजी अध्यक्षांना आता ‘मल्टिस्टेट’ नकोच
दूधवाढ हा जरी मल्टिस्टेट मागचा हेतू सांगितला जात असला तरी संघाची सत्तासूत्रे ताब्यात ठेवण्याचा सत्तारूढ गटाचा उद्देश त्यामागे लपून राहिला नव्हता; पण विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता मल्टिस्टेट नकोच, अशी भूमिका माजी अध्यक्षांनी घेतल्याचे समजते.
मल्टिस्टेटबाबत केंद्रीय निबंधकांकडे पाठविलेला प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यास बुधवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.
- रवींद्र आपटे,
अध्यक्ष, ‘गोकुळ’