‘गोकुळ’ला अरुण नरके यांच्या मार्गदर्शनाची गरज: शाहू महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:03 AM2018-11-30T00:03:22+5:302018-11-30T00:03:30+5:30
कोल्हापूर : धवलक्रांतीत वर्गीस कुरियन यांच्यानंतर अरुण नरके यांचे या क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. त्याच्या या अनुभवाची, मार्गदर्शनाची गरज ...
कोल्हापूर : धवलक्रांतीत वर्गीस कुरियन यांच्यानंतर अरुण नरके यांचे या क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. त्याच्या या अनुभवाची, मार्गदर्शनाची गरज आजही गोकुळ दूध संघाला आहे. ‘गोकुळ’चे संचालक चांगले काम करीत आहेत; पण नरके यांनी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन छत्रपती शाहू महाराज यांनी गुरुवारी येथे केले.
पन्हाळा-गगनबावडा वाहतूक ठेकेदार सत्कार समिती, गोकुळ दूध संघ व कर्मचारी आणि नरके कुटुंबीय यांच्यातर्फे अरुण नरके यांचा अमृतमहोत्सवी सत्कार झाला. दुधाळी मैदानावर झालेल्या या अत्यंत शानदार सोहळ््यात छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते त्यांचा गायवासरुची चांदीची मूर्ती देऊन सत्कार झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, संजय मंडलिक, बाळ पाटणकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यासह ‘गोकुळ’मधील सर्व संचालक व विविध क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते. संचालक विश्र्वास जाधव यांनी या सत्कारासाठी पुढाकार घेतला.
शाहू महाराज यांनी नरके यांच्यासोबतच्या आजवरच्या वाटचालीचा व सहवासाचा आढावा घेताना त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. अरुण नरके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. गेली ५० वर्षे त्यांचे शेती, क्रीडा, सहकार येथे अमूल्य योगदान मी पाहत आलो असल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अरुण नरके म्हणाले, ‘आतापर्यंत कधी वाढदिवस साजरा केला नाही. वडिलांच्या इच्छेने शेती आणि खेळात रमलो. यातून संस्थांमध्ये काम सुरू केले. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जवळ जाता आले. माझी चौथी पिढी शेतात असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. महाराष्ट्रात फक्त ‘गोकुळ’मुळेच काम करायला मिळाले. महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, यशवंत एकनाथ पाटील, डी. सी. नरके, शशिकांत नरके यांच्यामुळे मी घडलो.’
सदानंद बोरसे म्हणाले, ‘सहकार म्हणजे स्वाहाकार अशी मध्यमवर्गीय मानसिकता असते; पण ‘गोकुळ गाथा’ पुस्तकाची संहिता हातात आल्यानंतर नरके जसे आहेत तसे प्रांजळ स्वरूपात समोर आले. सर्वसामान्यांना घेऊन या नंदराजाने ‘गोकुळ’चे कुटुंब मोठे केले.’
प्रास्ताविकात अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ओबेरॉय म्हणाले, ‘नरके यांच्या कामाचा मोठा आवाका आहे. शेतीत नवीन प्रयोग करण्याची त्यांना सवय आहे. आमदारकी निवडली नाही तरी आमदार निवडण्यात महत्त्वाची भूमिका राहिली.’
सत्कार सोहळ्यास चेतन नरके, अजित नरके, सत्यशील नरके, देवराज नरके, स्नेहा नरके, स्निग्धा नरके, जयश्री नरके, लीना तुपे, सुमन नरके, शिल्पा नरके, ऐश्वर्या नरके या नरके कुटुंबीयांचा समावेश होता.
डोळ््यात अश्रू...
कुटुंबाला वेळ देऊ शकलो नसल्याची खंत आपल्याला सलत असल्याचे सांगताना नरके यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पत्नी सुनीता हिने खंबीरपणे सर्व कुटुंबाला सांभाळल्यामुळेच आज मी राष्ट्रीय स्तरापर्यंत काम करू शकलो, असेही त्यांनी नमूद केले.