Kolhapur: ‘गोकुळ’चे आता २५ लाख लिटरचे उद्दिष्ट; गाय दूध खरेदी दरात उद्यापासून दोन रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:04 IST2025-03-31T14:04:18+5:302025-03-31T14:04:45+5:30
सर्वाधिक परतावा देणारा संघ

Kolhapur: ‘गोकुळ’चे आता २५ लाख लिटरचे उद्दिष्ट; गाय दूध खरेदी दरात उद्यापासून दोन रुपयांची वाढ
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षांसह संचालकांनी मेहनत करून १९ लाख दूध संकलनाचा टप्पा पार केला असून, आता प्रतिदिनी २५ लाख लिटरचे उद्दिष्ट घेऊन काम करायचे आहे. ‘अमूल’शी स्पर्धा करत असताना गुणवत्तेच्या बळावर ‘गोकुळ’ देशातील सर्वोत्कृष्ट ब्रँड करण्याचे स्वप्न असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गाय दूध खरेदी दरात उद्या, मंगळवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
‘गोकुळ’च्या दूध प्रकल्प येथील पेट्रोलपंप, सायलेज बलेर व हार्वेस्टर मशिनरी प्रारंभ, बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सतेज पाटील होते. खासदार शाहू छत्रपती व आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, लिंबेवाडी (करमाळा) येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून कोट्यवधी रुपये संघाचे बचत होणार आहे, आगामी काळात ‘गोकुळ’ विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दूध संकलन वाढत असताना विक्रीही वाढत आहे. वाशी येथील पाच लाख लिटर पॅकिंग सेंटरही कमी पडत आहे. आगामी काळात कारभारात बचत करून मुंबई व पुण्यात नवीन पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत.
आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षांत दूध उत्पादकांना अकरा रुपये दरवाढ दिली. नवी मुंबई येथील पॅकिंग सेंटर, सौर ऊर्जा प्रकल्प, पेट्रोलपंप आदींच्या माध्यमातून संघाचे उत्पन्नवाढीचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांबरोबरच संस्था टिकल्या पाहिजेत, या भूमिकेतून ‘गोकुळ’च्या उत्पन्नातील ८५.६८ टक्के हिस्सा परताव्याच्या रूपाने शेतकऱ्यांना दिला जातो. आज देशात एवढा परतावा देणारा ‘गोकुळ’ एकमेव संघ आहे.
आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, महायुती सरकारने शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दूध अनुदान दिले. यापुढेही ‘गोकुळ’ला सरकारच्या पातळीवर मदतीचा हात देऊ.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, ‘अमूल’शी बरोबरी करणे मोठे आव्हान असले तरी ‘गोकुळ’ला अशक्य नाही. सर्वच पातळीवर एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.
अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, उच्चांकी संकलनाबरोबरच विक्रीही होत असून, गुणवत्तेच्या बळावर ‘युरोप’ देशात ‘गोकुळ’च्या उपपदार्थांना मागणी होत आहे. पशुखाद्यासोबत मिनरल मिक्सर मोफत देण्याचा प्रयत्न केला, आगामी काळात अनुदानावर शेतकऱ्यांना मिनरल मिक्सर देणार असून, त्यापोटी १५ कोटी रुपये बोजा पडणार आहे.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वागत केेले. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, स्मिता गवळी आदी उपस्थित होते.
हीरक महोत्सवानिमित्त संस्थांना भेटवस्तू
संघाच्या हीरक महोत्सवानिमित्त दूध संस्थांना जाजम व घड्याळ, दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा दूध फरक व संघाच्या कर्मचाऱ्यांना दोन कोटी रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले.