आजरा सूतगिरणीसमोरील अपघातात गोकुळचा अधिकारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:10+5:302021-02-20T05:14:10+5:30
अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी, नीलेश तानवडे हे १६ वर्षांपासून गोकुळ दूध संघात नोकरीत आहेत. चार दिवसांपूर्वी ते आपल्या देवर्डे ...
अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी, नीलेश तानवडे हे १६ वर्षांपासून गोकुळ दूध संघात नोकरीत आहेत. चार दिवसांपूर्वी ते आपल्या देवर्डे या गावी आले होते. सुटी संपवून कोल्हापूरला जात असताना हा अपघात झाला. आजरा सूतगिरणीशेजारी अज्ञात वाहनाची धडक नीलेशच्या मोटारसायकलला बसली. त्यामध्ये तो रस्त्याच्या मध्यभागी पडला व त्याच्या डोक्यावरून अज्ञात वाहन गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. दिवसभर पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत होते. मात्र, अद्यापही संबंधित वाहन सापडलेले नाही. अधिक तपास सहायक फौजदार चंद्रकांत मांगले, दत्ता शिंदे व नेताजी आंबूलकर करीत आहेत.
नीलेश तानवडे हे आई-वडिलांना एकुलते एक होते. वडील मारुती तानवडे दौलत साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेती करतात. बहिणीचे लग्न झाले आहे. शिवजयंतीदिवशी नीलेशचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.
आजरा ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन करून नीलेशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. देवर्डे येथे रात्री त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-----------------------
* हेल्मेट असते तर...
नीलेश कोल्हापूरला जात होता. त्याने हेल्मेट न घालता ते गाडीला अडकविले होते. अपघातात नीलेशच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्यामुळे तो जागीच ठार झाला. डोक्यावर हेल्मेट असते, तर कदाचित नीलेश जखमी झाला असता.