बेळगावजवळ गोकुळच्या अधिकाऱ्यांना डांबले, दूध दरात कपात केल्यामुळे दूध उत्पादक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 01:09 PM2024-02-17T13:09:42+5:302024-02-17T13:10:05+5:30
बेळगाव : गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्वसूचना न देता गाई -म्हशीच्या दूध दरात कपात केल्यामुळे सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक ...
बेळगाव : गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्वसूचना न देता गाई -म्हशीच्या दूध दरात कपात केल्यामुळे सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हापूरप्रमाणे दर वाढवून मिळावा अशी मागणी करत गोकुळच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात डांबून बाहेरून टाळे ठोकले. ही घटना अलतगा (ता. जि. बेळगाव) येथे शुक्रवारी दुपारी घडली.
सीमाभागातील बेळगाव व खानापूर तालुक्यातून दररोज एकूण सुमारे ४० हजार लिटर दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध केंद्राच्या ठिकाणी जाते. या पद्धतीने सीमाभागातील दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या गोकुळ दूध संघाने १ फेब्रुवारी २०२४ पासून गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर ४.५० रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या दूध उत्पादकांनी शुक्रवारी सकाळी अलतगा येथील श्री ब्रह्मलिंग दूध उत्पादक संघाच्या शाखेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून शाखेला घेराव घातला. गोकुळचे विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे यांना जाब विचारला. त्यावेळी हरकारे यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
तथापि, दूध उत्पादकांनी जोपर्यंत दूध दरवाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे ठासून सांगितले. तसेच एवढ्यावर न थांबता आक्रमक झालेल्या दूध उत्पादकांनी विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे, गोकुळ दूध संकलक शरद पवार, परशराम पारधी व कुलदीप पवार यांना संघाच्या कार्यालयात डांबून कार्यालयाला टाळे ठोकले.
आंदोलक दूध उत्पादक बाळू पाटील म्हणाले की, काही लोकांनी कोल्हापूरला जाऊन प्रयत्न केल्यानंतर ५ रुपये हा दर वाढवून ६ रुपये करण्यात आला. सध्या दुधाचा दर इतका कमी करण्यात आला आहे की बेरीज, वजाबाकी केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच पैसे उरत नाहीत.