‘गोकुळ’, जिल्हा बँकेसाठी जुना पोटनियमच
By Admin | Published: November 1, 2014 12:40 AM2014-11-01T00:40:06+5:302014-11-01T00:40:56+5:30
क्रियाशील-अक्रियाशीलमधून सभासदांची सुटका : पुढील निवडणुका होणार सुधारित घटनादुरुस्तीनुसार
राजाराम लोंढे - कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसह निवडणुकीस पात्र असणाऱ्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका जुन्या पोटनियमानुसारच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत क्रियाशील व अक्रियाशील सभासदांची छाननी लावली जाणार नाही. या संस्थांच्या पुढील पंचवार्षिक निवडणुका सुधारित घटनादुरुस्तीनुसार होणार आहेत. पात्र संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, कोल्हापुरात येत्या चार-पाच महिन्यांत २,६८९ संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
केंद्र सरकारने सहकारी संस्थांची घटनादुरुस्ती करून संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून येथून पुढे सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कॉँग्रेस आघाडी सरकारने दुष्काळ, लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करीत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. विधानसभा निवडणुका संपल्याने पात्र संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डिसेंबर २०१४ अखेर सुमारे २,६८९ संस्था निवडणुकीस पात्र आहेत. या संस्थांच्या वर्गवारीनुसार प्राधिकरणाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील सुमारे ३७७ संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर इतर संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. प्राधिकरणाने बॅँकेकडे ३१ नोव्हेंबरपर्यंत मतदारांची यादी मागविली आहे; पण सुधारित घटनादुरुस्तीनुसार मतदार यादी तयार केली जाणार का? याविषयी संस्थापातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे. सुधारित पोटनियमानुसार यादी बनविली तर अनेक संस्था (पिशवीतील) मतदार यादीतून बाहेर राहणार आहेत. जिल्हा बॅँकेशी संलग्न संस्थांनी नवीन पोटनियमानुसार आपले भागभांडवल वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.