‘गोकुळ’मध्ये ‘पी. एन.’, महाडिक - ‘सतेज’, मुश्रीफ यांच्यातच खडाखडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:03+5:302021-02-07T04:22:03+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व गृहराज्यमंत्री सतेज ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातच खडाखडी हाेणार आहे. त्यानुसार जोडण्या सुरू झाल्या असून, ही आघाडी जिल्हा बँकेसह बाजार समितीमध्येही कायम राहणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ गटाला जोरदार धक्के देण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखल्याने निवडणुकीत काट्याची टक्कर पाहावयास मिळणार, हे निश्चित आहे.
निवडणुकांचा बिगुल वाजल्याने ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेत कशी समीकरणे उदयास येणार? याची उत्सुकता आहे. सर्वाधिक लक्ष हे ‘गोकुळ’बाबत असून, येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पॅनलचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’च्या सत्तेसाठी टाेकाचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी २०१४ च्या विधानसभेचा पैरा फेडला. मात्र, सत्तारूढ गटाने विचारात न घेताच निर्णय घेतल्याची सल मुश्रीफ यांच्या मनात आहे. पालकमंत्री पदावरून मंत्री मुश्रीफ हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा वर्षभर जिल्ह्यात सुरू आहे. त्यात जिल्हा बँकेची सत्ता मंत्री मुश्रीफ यांना हवी असल्याने ते आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहतील, असा तर्क सत्तारूढ गटाचे कार्यकर्ते लावत आहेत. मात्र, मंत्री मुश्रीफ हे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत विरोधी पॅनलचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे सत्तारूढ गट सावध झाला असून, त्यांनीही जोडण्या लावल्या आहेत. जिल्हा बँकेच्या राजकारणाचा ‘हबकी’ डाव मारण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी विकास संस्था गटात ‘करवीर’ व ‘हातकणंगले’ येथेच ताकद आहे. त्यामुळे बँकेच्या सत्तेवर मोठा परिणाम होईल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत नाही.
महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावला
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आहे. ती आघाडी जिल्ह्यातील सर्व संस्थांमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव आमदार पी. एन. पाटील यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, त्यांनी महाडिक यांना सोडण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या दोन्ही काँग्रेसमध्ये आहे.
पॅनलमध्ये निम्म्या जागा
संचालक मंडळात राजेश पाटील व विलास कांबळे हे दोन राष्ट्रवादीचे संचालक आहेत. आणखी तीन जागा देऊन समझोता करण्याचा प्रयत्न आहे. विरोधी गटासोबत राष्ट्रवादी गेली तर निम्म्या जागा मिळू शकतात. त्यामुळेच विरोधी गटासोबत जाण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे.
‘के.पी.’, राजेश पाटील यांची कोंडी
राधानगरी व ‘बिद्री’च्या राजकारणात खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबीटकर हे के. पी. पाटील यांचे विरोधक आहेत. त्यामुळे सत्तारूढ गटासोबत गेले तर ‘राधानगरी’च्या राजकारणात पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांची मदत मिळू शकते. मात्र, यासाठी त्यांना मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडावी लागेल. आमदार राजेश पाटील यांना सत्तारूढ गटाने ‘गोकुळ’मध्ये संधी दिली होती. मात्र, त्यानंतर ते राष्ट्रवादीचे आमदार झाले. त्यातच खासदार मंडलिक हे त्यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे या दोघांचीही काेंडी होणार आहे.