‘गोकुळ’च्या सत्तेसाठीच ‘मल्टिस्टेट’चा घाट :सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:29 AM2018-09-10T00:29:11+5:302018-09-10T00:29:15+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची गत निवडणूक जड गेल्याने एका व्यापाऱ्याच्या हातात संघ राहणार नाही, याची खात्री झाल्याने ‘मल्टिस्टेट’चा घाट घातल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. कार्यक्षेत्राबाहेर दूध संकलन केल्याने दोन वर्षांत ८५.२१ कोटींचा तोटा झाल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला असताना कुणाच्या सोयीसाठी हा निर्णय घेता? असा सवाल करत संस्थांनी मल्टिस्टेटच्या विरोधाचे ठराव करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
‘गोकुळ’च्या २१ सप्टेंबरच्या सभेपुढे मल्टिस्टेटचा विषय असून विरोध करण्यासाठी ‘गोकुळ बचाव कृती समिती’च्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक रविवारी शासकीय विश्रामगृहात झाली. राजकीय द्वेषातून नव्हे तर उत्पादकांच्या हितासाठी विरोध असल्याचे सांगत आमदार पाटील म्हणाले, गेली ५६ वर्षे जिल्ह्यातील सामान्य माणसांच्या घामातून संघाचा डोलारा उभा राहिला, त्यांच्या स्वाभिमानाला व अधिकाराला धक्का लागत आहे. कार्यक्षेत्रातील बाहेरील दूध खरेदी केल्याने सन २०१५-१६ मध्ये २४.४४ कोटी, तर सन २०१७-१८ मध्ये ६४.७७ कोटींचा तोटा झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात असताना मल्टिस्टेटचा घाट का? मागील निवडणूक जड गेल्यानेच यावेळी सत्ता जाणार या भीतीने एका व्यापाºयाचे प्रयत्न सुरू आहेत. कोणाला संधी द्यायचा हा सभासदांचा निर्णय आहे; पण ज्यांचे योगदान काही नाही, अशा प्रवृत्तीला बाजूला ठेवा. कर्नाटकातून एजन्सीमार्फत दूध गोळा केले जाते, या एजन्सी कोणाच्या आहेत? तेथील उत्पादकांना किती पैसे देता? याचे उत्तर ‘गोकुळ’च्या कारभाºयांनी द्यावे. या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी उद्यापासून प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ते जाणार असून संस्थांकडून मल्टिस्टेटच्या विरोधाचे १८ सप्टेंबरपर्यंत ठराव गोळा करणार आहेत. दबावापोटी काही संस्था आमच्याकडे ठराव देऊ शकत नसल्या तरी त्यांनी सहायक निबंधकांकडे द्यावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. माजी आमदार संपतराव पवार, बाळासाहेब कुपेकर, युवराज गवळी, विद्याधर गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब देवकर यांनी प्रास्ताविक केले. ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील, विजयसिंह मोरे, सदाशिव चरापले, बाबासाहेब चौगले, महेश नरसिंगराव पाटील, एस. आर. पाटील, बजरंग पाटील, मधुआप्पा पाटील, किरणसिंह पाटील, अमित कांबळे, आदी उपस्थित होते.
गाईचे दूध तोट्यात कसे?
मुंबईत रोज ४.४० लाख लिटर ‘गोकुळ’चे दुधाची ५६ रुपयांनी, तर गाईच्या २.२० लाख लिटर टोण्ड दुधाची ४६ रुपयांनी विक्री होते. खरेदी-विक्रीमध्ये सरासरी २० रुपये तफावत असताना संघ तोट्यात कसा? गाईचे दूध नाकारण्यामागे नेमका हेतू काय? असा सवाल पाटील यांनी केला.
कायदा-सुव्यवस्थेस
पोलीस अधीक्षकच जबाबदार
सभास्थळी १८०० खुर्च्या ठेवल्या आहेत. संघाचे चार हजार सभासद असल्याने सभा खुल्या मैदानात घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असे पाटील यांनी सांगितले.
पॅनेलमध्ये जातिवंतांना घ्या
पाच वर्षे दूध घालूनही सभासद करून घेतले नसल्याचे प्रदीप पाटील-भुयेकर, सी. बी. चौगले यांनी सांगितले. गेल्यावेळेला अंबरीश घाटगे यांच्यासाठी जिवाचे रान केले, सभासदांसाठी त्यांच्याकडे गेल्यावर आपण कागलचे असल्याचे सांगितले. साहेब, पुढच्या वेळेला जातिवंतांनाच पॅनेलमध्ये घ्या, असे चौगले यांनी सांगितले.
हसन मुश्रीफही सभेला येणार
आजरा कारखान्याचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, हसन मुश्रीफ यांना विचारूनच बैठकीला आलो. मल्टिस्टेटला विरोध करण्याची त्यांचीही भूमिका आहे. ते स्वत: सभेला येणार आहेत. कोल्हापूरच्या स्वाभिमान व हक्काची लढाई आहे. स्वाभिमानासाठी जिल्ह्यातील सर्व नेते सभेला उपस्थित राहून विरोध करतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा?
ताळेबंदानुसार ११६.९८ कोटींची बाहेरील कर्जे व देणी, ७४.८२ कोटी डिबेंचर्स, ४२.३३ कोटी दूध उत्पादक भविष्य निधी व १४८.०२ कोटी चालू देणी आहेत. त्याचबरोबर संघाची कायम मालमत्ता २१७.९३ कोटींची आहे. ताळेबंदास जरी १७०.३३ कोटींची गुंतवणूक दिसत असली तरी त्यामध्ये वापरता येणारी मुदतबंद ठेव फक्त ९२.१० कोटी आहे. ही रक्कम उत्पादकांना दर फरकापोटी द्यावी लागणार आहे, म्हणजे संघ आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे, हे स्पष्ट होते, असे पाटील यांनी सांगितले.
संचालकांना नारळ
आता संस्थांचा गठ्ठा असल्याने ज्येष्ठ संचालकांना किंमत आहे. उद्या कर्नाटकातील संस्था वाढल्याने व्यापारी मंडळी संघाच्या सुपरवायझरला उभे करतील. कार्यक्षेत्र वाढले तर तेथील संचालक येणार असल्याने विद्यमान चार-पाच जणांना नारळ मिळणार हे निश्चित असल्याचे पाटील म्हणाले.