‘गोकुळ’ कार्यक्रम अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:18+5:302021-03-23T04:26:18+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) निवडणूक कार्यक्रम अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच आहे. एकीकडे सत्तारधाऱ्यांनी ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) निवडणूक कार्यक्रम अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच आहे. एकीकडे सत्तारधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाकडे दूध उत्पादकांच्या नजरा लागल्या आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणूक प्रक्रिया स्थगित व सुरू यातच आडकली आहे. न्यायालयीन लढाईनंतर निवडणुकीला गती आली आहे. संघाची अंतिम यादी १२ मार्चला प्रसिद्ध झाली. त्यानंतर दहा ते वीस दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा असतो. त्यानुसार साेमवारी अकरा दिवस पूर्ण झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर हे निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंजुरीसाठी पाठवतील, असे वाटत होते. मात्र कार्यक्रम अद्याप त्यांच्याकडेच आहे.
सत्तारूढ गट निवडणुकीच्या स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेला आहे, तर विरोधकांनी आघाडीची घोषणा करून रिंगणात शड्डू ठोकला आहे. अशा वातावरणात निवडणूक कार्यक्रमाकडे दूध उत्पादकांच्या नजरा लागल्या आहेत.
कोट-
‘गोकुळ’ निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप प्राधिकरणाकडे पाठविलेला नाही. येत्या दोन दिवसांत तो पाठवून मंजुरी घेतली जाईल.
-वैभव नावडकर (निवडणूक निर्णय अधिकारी, गोकुळ)