Kolhapur- गोकुळ सभा: सतेज पाटील प्रश्नांवर अर्धसत्य सांगतात, शौमिक महाडिक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:39 PM2023-09-16T13:39:51+5:302023-09-16T13:40:25+5:30
गेल्या आर्थिक वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
कोल्हापूर : वासाचे दूध परत करणार, असे सतेज पाटील सांगत होते. मात्र, सभेत नेमके किती वासाचे दूध परत केले हे सांगितले नाही. यामुळे सतेज पाटील हे गोकुळवर विचारलेल्या प्रश्नावर अर्धसत्य सांगतात, असा आरोप गोकुळमधील विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी समांतर सभेत केला.
गोकुळ दूध विक्रीचा पुण्यातील ठेका पूर्वी महाडिक यांच्या नातेवाईकांकडे होता, असे सांगितले. मग आता सतेज पाटील यांच्या नातेवाईकाकडे आहे का? असेल तर हे सांगण्याचे धारिष्ट्य का दाखविले नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. गेल्या आर्थिक वर्षाच्या कारभारात भ्रष्टाचार झाला आहे. लेखा परीक्षणातही ताशेरे आहेत. याला व्यासपीठावर बसलेल्या संचालकांची मान्यता असेल, माझी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
महाडिक म्हणाल्या, एखाद्या संस्थेचे सलग आठ दिवस वासाचे दूध काढले तर त्या संस्थेचे नुकसान होते. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना दिशाभूल करणारे उत्तर दिले. गोकुळने १२०० दूध संस्थांना अ वर्ग सभासद करून घेतले आहे. इतक्या संस्था वाढल्या असतील तर दूध संकलनात वाढ का नाही? अशी विचारणा केली होती. मात्र, संस्थांना शासनाने मान्यता दिली आहे, असे चुकीचे उत्तर दिले. पुण्यात गोकुळ दूध विक्रीचा ठेका घेतलेले रणजित धुमाळ कोण? असा प्रश्न विचारला होता. मात्र, शेवटपर्यंत ते कोण आहेत ते सांगितलेले नाही. केवळ पूर्वी महाडिक यांच्या नातेवाईकांकडे ठेका होता. आता नवीन ठेकेदार नेमला आहे.
एकेका संचालकांना १५० पासेस दिले
एकेका संचालकांना १५० प्रवेश पास वितरण करण्यात आले होते. एकाच वेळी मोठ्या संख्येने सभासद आल्यानंतर त्यांना सभेच्या ठिकाणी प्रवेशाची व्यवस्था तोकडी होती. यातूनच सभासदांचा उद्रेक झाला. त्याला जबाबदार कोण? अशीही विचारणा महाडिक यांनी केली.
चार भिंतीत चर्चेची सवय नाही..
संचालकांनी सभेत प्रश्न विचारायचे नाहीत, सभासदांनी विचारायचे असतात, असे मला व्यासपीठावरून सांगण्यात आले. पण मला सत्ताधारी संचालकांप्रमाणे चार भिंतीत चर्चा करण्याची सवय नाही. मला निवडून दिलेल्या सभासदांसमोर प्रश्न विचारायचे होते, असा खुलासाही महाडिक यांनी केला.