‘गोकुळ’ नोकरभरतीस स्थगिती दुसऱ्यांदा निर्णय; विधान परिषदेत चर्चा; ‘सीआयडी’ चौकशी करा : मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:07 AM2018-07-14T01:07:36+5:302018-07-14T01:08:33+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकरभरतीबाबत आरक्षणाची नियमावली पाळली नसेल तर चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेस स्थगिती राहील, अशी माहिती दुग्धविकास
नागपूर/ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकरभरतीबाबत आरक्षणाची नियमावली पाळली नसेल तर चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेस स्थगिती राहील, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी विरोधकांनी जोरदार गोंधळ केल्यानंतर जानकर यांनी भरतीला दुसºयांदा स्थगिती दिली.
गोकुळ नोकरभरतीत भ्रष्टाचार झाल्याची लक्षवेधी सूचना सदस्य सतेज पाटील यांनी मांडली होती. मंत्र्यांची स्थगिती असताना भरती होतेच कशी? जिल्हा बॅँकांप्रमाणे ‘गोकुळ’ला भरतीचे नियम का लागू नाहीत? असा सवाल करीत भरतीमुळे वीस कोटी रुपयांचा भुर्दंड संघावर बसणार असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. लक्षवेधीच्या उत्तरात जानकर म्हणाले, गोकुळ दूधसंघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. या दूधसंघात ४२९ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे.
नोकर भरतीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित उपनिबंधक यांना आहेत. २००४ च्या सहकारी कायद्यानुसार या भरतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण ठेवले नाही. यासाठी दुग्धविकास संस्थामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा लागेल. भरती प्रक्रियेबाबत सहकार आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळून आल्यास पुन्हा चौकशी करून कारवाई करण्यात येईल. भरती प्रक्रियेसाठी आकृतिबंध महत्त्वाचा असल्याने याचीही चौकशी करण्यात येईल, असेही जानकर यांनी सांगितले.
‘गोकुळ’ला शासकीय अनुदान मिळत नसल्याने नोकरभरतीमध्ये आरक्षणाचे नियम लागू नाहीत, सहकार खात्याचे नियम ‘पदुम’ला लागू होत नाहीत. त्याचबरोबर ‘डी. आर. डी’ न्यायालयाने भरतीस दिलेली स्थगिती उठविल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. यावर आक्षेप घेत ‘शेकाप’चे जयंत पाटील म्हणाले, ‘पदुम’ हा विभाग सहकार खात्यांच्या अंतर्गत येतो. ‘गोकुळ’ सहकार कायद्यानुसार नोंद असताना भरतीमध्ये आरक्षणाला बगल का दिली जाते? भरतीत पंधरा लाखांचा व्यवहार झाला असून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याने ही प्रक्रिया थांबवावी. भरतीत मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याचे आरोप प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंत्री जानकर यांची कोंडी केली. ‘गोकुळ’ला शासकीय भाग भांडवल नाहीतर शासननियुक्त प्रतिनिधी का पाठवला? ‘एन.डी.डी.बी.’च्या माध्यमातून शासन कोट्यवधींची मदत करते. ‘गोकुळ’च्या विस्तारीकरणासाठी शासनाने ९४ कोटी रुपये दिले असताना तुम्ही पाठराखण का करता? त्यामध्ये तुमचा काय इंटरेस्ट आहे? असा सवाल करीत ‘गोकुळ’ची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी मुंडे यांनी केली. सहकार आयुक्तांमार्फत ‘गोकुळ’ची चौकशी करीत असाल तर या संस्थेला सहकार खात्याचे नियम का लागू नाहीत? अशी विचारणा सुनील तटकरे यांनी केली. प्रवीण दरेकर, विनायक मेटे, संजय दत्त यांनीही हा विषय ताणून धरल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. मंत्री जानकर यांनी भरतीला स्थगिती दिल्याची घोषणा केली.
मंत्र्यांची स्थगिती असताना ‘गोकुळ’मध्ये भरती होतेच कशी? जिल्हा बॅँकांप्रमाणे ‘गोकुळ’ला भरतीचे नियम का लागू नाहीत? या भरतीमुळे वीस कोटी रुपयांचा भुर्दंड संघावर बसणार आहे.
- सतेज पाटील, आमदार
एकूण भरती ४२९
पहिल्या टप्प्यात २६१
यामध्ये कुशल कामगार १००
कामगार ८३
लिपिक २५
तांत्रिक व फिल्ड आॅफिसर ५३