‘गोकुळ शक्ती’ दूध मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल, सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:34 AM2024-02-03T11:34:32+5:302024-02-03T11:34:58+5:30
गुणवत्तेच्या बळावर ‘गोकुळ’ महाराष्ट्राचा ब्रॅण्ड बनेल : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : कसदार ‘गोकुळ’ दुधाने ग्राहकांना भुरळ पाडली असून, आता नव्या दमाचे ‘गोकुळ शक्ती’ दूध निश्चितच मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
‘गोकुळ’च्या ‘गोकुळ शक्ती’ नवीन गुणप्रतीच्या टोण्ड दुधाची विक्री प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारंभात ते बोलत होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे ‘गोकुळ’ने मुंबई, पुणे, कोकण इतर ठिकाणी आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. दिवसेंदिवस दुधाची मागणी वाढत असून, ग्राहकांच्या मागणीनुसार गोकुळने ४.१ फॅट व ९.२ एसएनएफ या प्रतीचे गोकुळ शक्ती या नावाचे स्पेशल होमोजिनाइज्ड व बॅक्टोफ्युज दूध मार्केटमध्ये आणले आहे. आगामी काळात ‘गोकुळ’ महाराष्ट्राचा ब्रॅण्ड होईल.
अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी , पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यात केली जाते. ग्राहकांकडून विशेषतः स्पेशल होमोजिनाइज्ड केलेले टोण्ड दुधाची उपलब्धता करून देण्याची मागणी होती, त्यामुळे हे दूध बाजारात आणले आहे.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संचालक आदी उपस्थित होते. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.