गोकुळ शिरगावची स्मशानभूमी गायब

By Admin | Published: October 5, 2015 12:31 AM2015-10-05T00:31:30+5:302015-10-06T00:40:44+5:30

जागेचा वाद पेटला: उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची ग्रामस्थांवर वेळ

Gokul Shiragaran graveyard missing | गोकुळ शिरगावची स्मशानभूमी गायब

गोकुळ शिरगावची स्मशानभूमी गायब

googlenewsNext

कोल्हापूर : ऐतिहासिक श्रीकृष्ण मंदिर, औद्योगिक वसाहतीमुळे देशाच्या नकाशावर पोहोचलेल्या, महसुली उत्पन्नात जिल्'ात द्वितीय स्थानी असलेल्या गोकुळ शिरगावची स्मशानभूमीच गायब झाली आहे. पाडण्यात आलेले जुने स्मशानशेड आणि अर्धवट अवस्थेतील नव्या स्मशानशेडच्या बांधकामामुळे ग्रामस्थांना सध्या उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
गावाच्या लोकसंख्या वाढीनुसार गुरुवारपर्यंत (दि. १) अस्तित्वात असलेल्या स्मशानशेडची ३५ वर्षांपूर्वी उभारणी केल्याचे समजते. या बांधकामावेळी राष्ट्रीय महामार्ग दुपदरी होता. पर्यायाने स्मशानशेडसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होती. मात्र, महामार्ग चौपदरीकरणावेळी सध्याची अस्तित्वात असलेल्या स्मशानशेडची काही जागा शासनाने संपादित केली. परिणामी, स्मशानशेडमध्ये अंत्यसंस्कार व इतर विधी करण्यास जागा अपुरी पडत होती. त्यावर ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावठाणातील लोकांसाठी सध्याच्या स्मशानभूमीचे विस्तारीकरण करून चित्रनगरी परिसरातील गायरान जमिनीकडे नवी स्मशानभूमी उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निधीची उपलब्धता करण्यात आली. त्यानुसार करवीर निवासिनी देवस्थानच्या पोटखराब १३ गुंठे जागेत ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या स्मशानभूमी विस्तारीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामावर या परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला. शिवाय करवीर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. मात्र, ग्रामपंचायतीने संबंधित स्मशानशेडचे काम सुरू ठेवले. यावर येथील बाळासो चव्हाण यांनी न्यायालयात दावा दाखल करून संबंधित कामाला तात्पुरती मनाई मिळविली. या वादातच सध्या अस्तित्वात असलेले स्मशानभूमीवरील पत्राशेड व बांधकाम अज्ञातांकडून पाडण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी एका महिलेच्या पार्थिवावर नव्या स्मशानभूमीच्या वादग्रस्त जागा व बांधकामासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले. सार्वजनिक प्रश्नांवर वाद टाळून सर्वसामंजस्याने मार्ग काढून हा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे. ही जबाबदारी जशी ग्रामपंचायतीची आहे, तसेच गावातील नेतेमंडळी आणि ग्रामस्थांची आहे. अन्यथा उद्या एखादा मृतदेह ग्रामपंचायतीच्या दारात अंत्यविधीसाठी आल्यास आश्चर्य वाटायला नको. (प्रतिनिधी)

असा झाला स्मशानशेडचा प्रवास
गावातील ३५ वर्षांपूर्वीची परंपरागत स्मशानभूमी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ओढ्यानजीकच्या खासगी पडीक जागेत आहे. गुरुवारपर्यंत सदर स्मशानशेडचा वापर सुरू होता. ही स्मशानभूमी अस्तित्वात येण्यापूर्वी सध्या वादग्रस्त असलेल्या नव्या स्मशानशेडच्या बांधकामाशेजारी ओढापात्राजवळ काही पार्थिवांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यापूर्वी गावातील ‘पाणोता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याजवळील जागेत अंत्यसंस्कार केले जात होते. काही ग्रामस्थांच्या स्वत:च्या शेतीत अथवा सरकारी पडजागेत मृतदेहांचे दहन अथवा दफन करण्यात येत होते.

गेल्या तीन दिवसांपूर्वी अस्तित्वात असलेले स्मशानशेड खासगी जागेत होते. वर्षाकाठी गावातील मृत्यूचे प्रमाण सरासरी ५० ते ६० इतके आहे. संबंधित स्मशानशेड एकापेक्षा अधिक मृतदेहांच्या अंत्यसंस्काराला अपुरी पडत होते. त्यावर ग्रामस्थांनी ग्रामसभेद्वारे स्मशानभूमीच्या दक्षिण-उत्तर परंपरागत जागेत सुशोभीकरण व विस्ताराची मागणी केली. त्यानुसार ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू केले. या ठिकाणी मृतदेहांच्या दहनानंतर त्याचा कोणालाही त्रास होणार नाही, अशी दक्षता घेतली जाणार आहे. या बांधकामासाठी आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत.
- एकनाथ सूर्यवंशी, ग्रामसेवक

वाद कायम
गावात नेतेमंडळींची संख्या कमी नाही. मात्र, त्यांच्याकडून स्मशानभूमीसारख्या प्रश्नावर कधी गंभीर भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या राजकारणामुळे आज स्मशानभूमी गायब होण्याचा प्रकार घडला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि विद्यमान आमदार अमल महाडिक यांनी हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची सूचना यापूर्वीही ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.


वादाचा मुद्दा असा...
जुन्या स्मशानशेडच्या दुरुस्तीऐवजी, ग्रामपंचायतीकडून निधीचा दुरुपयोग करून सध्या उभारण्यात येत असलेल्या नव्या स्मशानशेडमुळे नागरिकांना प्रदूषणास सामोरे जावे लागणार आहे. मात्र, सध्या अस्तित्वात असलेले स्मशानशेड अपुरी पडत असल्याने नव्या जागेत प्रशस्त स्मशानशेड उभे करून नागरिकांची गैरसोय टाळली जाणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी नवे स्मशानशेड उभारावे, अशी बहुतांश ग्रामस्थांची मागणी असल्याने ग्रामपंचायत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून स्मशानशेडचा वाद पेटला आहे. गावातील आघाड्यांच्या राजकारणामुळे स्मशानशेड दुरुस्तीचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला असून, सध्या उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची लाजिरवाणी वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
केवळ जमिनीचे वाढते भाव आणि नवीन स्मशानभूमीमुळे जागांचे दर पडण्याची भीती हाच स्मशानभूमी गायब होण्यामागील कळीचा मुद्दा असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Gokul Shiragaran graveyard missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.