बसच्या चाकाखाली सापडून गोकुळ शिरगावच्या व्यावसायिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:14+5:302020-12-07T04:19:14+5:30
कोल्हापूर : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला एस.टी. बसची धडक बसून पोटावरून चाक गेल्याने चायनीज व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर दुचाकीवरील ...
कोल्हापूर : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला एस.टी. बसची धडक बसून पोटावरून चाक गेल्याने चायनीज व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर दुचाकीवरील पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला. संदीप मारुती सुतार (वय २६, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) असे ठार झालेल्याचे नाव आहे; तर शुभम शिवाजी कदम (२५, रा. गोकुळ शिरगाव) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी ताराराणी चौक ते रुईकर कॉलनी मार्गावर लिशा हॉटेल चौकात घडला. चायनीज सेंटरसाठी कुक शोधणे आणि खरेदीसाठी ते कोल्हापुरात आले असताना ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथील संदीप सुतार व शुभम कदम हे दोघे मित्र यापूर्वी एका चायनीज सेंटरवर कामाला होते; पण काही दिवसांपासून त्या दोघांनी भागीदारीत स्वत:चा चायनीज व्यवसाय सुरू केला; पण शनिवार (दि. ५) पासून या चायनीज सेंटरवरील कुक अचानक बंद झाल्याने नवीन कुकला शोधण्यासाठी व बाजार भरण्यासाठी ते दोघे एका दुचाकीवरून कोल्हापूर शहरात येत होते. लिशा हॉटेल चौकात सिग्नल पडल्याने ते उभे राहिले होते. त्याच वेळी एस.टी. बस कोल्हापूरहून मिरजेकडे जात होती. सिग्नल चाैकात वळणावर या बसची धडक लागून दोघेही दुचाकीस्वार जमिनीवर पडले. त्याच वेळी दोघांच्याही पोटावरून बसचे मागील चाक गेले. अपघातावेळी गोंधळ उडाला. नागरिकांनी धावत्या बसला थांबविले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. नागरिकांनी खासगी वाहनांतून दोघांना गंभीर अवस्थेत तातडीने सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचार सुरू असतानाच संदीप सुतार याचा पोटात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुसरा जखमी शुभम कदम याच्याही पोटात रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचीही प्रकृती अत्यवस्थ आहे. दुर्घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत एस.टी. बसचालकावर गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यत शाहूपुरी पोलीस ठाण्यात सुरू होते.
फोटो नं. ०६१२२०२०-कोल-संदीप सुतार (ॲक्सिडेंट)
(तानाजी)