गोकुळ शिरगाव फाट्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:54+5:302021-02-12T04:21:54+5:30
विजय कदम लोकमत न्यूज नेटवर्क कणेरी : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) फाट्यावरील राहिलेले ...
विजय कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
कणेरी : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) फाट्यावरील राहिलेले अतिक्रमणही गुरुवारी रस्ते विकास महामंडळाने काढून टाकल्याने अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या या फाट्याने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या फाट्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली होती.
गोकुळ शिरगाव येथील एमआयडीसी फाट्यावर अनेकांनी महामार्गालगतच डाव्या व उजव्या बाजूला दुकाने थाटल्याने येथे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत होती. आधीच या फाट्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात फाट्यालगतच अतिक्रमण झाल्याने उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (गोशिमा) व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात बैठक झाली. त्यात अतिक्रमण काढणे, हाच वाहतूक कोंडीवरील उपाय असल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी महामार्गालगतच्या खोकेधारकांना त्वरित आपले खोके स्वतःहून काढून घेण्याची विनंती केली होती. मात्र, काहींनी याला प्रतिसाद दिला नसल्याने रस्ते विकास महामंडळाने या खोक्यांवर हातोडा मारत गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाटा अतिक्रमणमुक्त केला.
कोट : गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्यावरील अतिक्रमणे काढल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी व यामुळे उद्भवणारे अपघात, वाद टळणार आहेत. अतिक्रमण काढलेल्या खोकेधारकांचे शासनाने पुनर्वसन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
श्रीकांत पोतनीस
अध्यक्ष, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (गोशिमा)
फोटो : ११ गोकुळ शिरगाव अतिक्रमण
गोकुळ शिरगाव एमआयडीसी फाट्यावरील अतिक्रमण केलेले खोके काढल्याने हा फाटा आता अतिक्रमणमुक्त होऊन मोकळा श्वास घेत आहे.