‘गोकूळ‘ काँग्रेसकडेच राहिला पाहिजे - नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:17+5:302021-03-19T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ दूध संघाची स्थापना काँग्रेसने केली असून तो काँग्रेसकडेच राहिला पाहिजे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी ताकदीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’ दूध संघाची स्थापना काँग्रेसने केली असून तो काँग्रेसकडेच राहिला पाहिजे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागा, असे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या असून त्यासाठी स्थानिक पातळीवर पक्ष भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील रहा, असे त्यांनी सांगितले.
पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर ते प्रत्येक जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची बैठक गांधी भवन, मुंबई येथे झाली. यावेळी प्रत्येक तालुकाध्यक्षांकडून आढावा घेतला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करायची आहे. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असून गावोगावी पक्ष रुजवण्यासाठी नेटाने कामाला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिले.
जिल्ह्यात ‘गोकूळ’सह महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तिथे काँग्रेस पक्षाची ताकद वाढली पाहिजे. ‘गोकूळ’ची स्थापना काँग्रेसने केली असून तो काँग्रेसकडेच राहिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला खासदार हुसेन दलवाई, चारूलता टोकस, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, ॲड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, सूर्यकांत पाटील -बुध्दीहाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्ष संध्या घोटणे, राहुल खंजिरे आदी उपस्थित होते.
काम नाही त्यांने थांबावे
येथून मागे कोणी काय काम केले, हे विचारत बसणार नाही. येथून पुढे पक्षवाढीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. जे तालुकाध्यक्ष काम करणार नाहीत, त्यांनी थांबावे, असे स्पष्ट शब्दात प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सुनावले.