Kolhapur: 'गोकुळ' म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार - अरुण डोंगळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 05:50 PM2024-06-01T17:50:41+5:302024-06-01T17:51:12+5:30

हीरकमहोत्सवी वर्ष संकल्पपूर्तीचे

Gokul to implement incentive scheme for increasing buffalo milk says Arun Dongle  | Kolhapur: 'गोकुळ' म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार - अरुण डोंगळे 

Kolhapur: 'गोकुळ' म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहनपर योजना राबविणार - अरुण डोंगळे 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) मधील सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हीरकमहोत्सव वर्ष असून, ते संकल्पपूर्तीचे आणि दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे ठरले आहे. गेल्यावर्षभरामध्ये अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये दूध उत्पादकांसोबतच गोकुळशी संग्लन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दूध संकलनाचा १८ लाख लिटरचा टप्पा पार करता आला याचा आनंद आहे. शेतकऱ्यांसाठी गोकुळमार्फत नवनवीन प्रोत्साहनपर योजना राबविणार असल्याची ग्वाही अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी शुक्रवारी येथे दिली. अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीच्या व जागतिक दुग्ध दिनाच्या निमित्ताने त्यांनी गोकुळ परिवारातील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी व संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

ग्राहकांची म्हैस दुधाला असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादकांसाठी योजना राबवण्यावर भर असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले. ते म्हणाले, वीस लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट, म्हैस दूधवाढीसाठी प्रोत्साहन योजना, गोकुळच्या दुधासह अन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी मार्केटिंग यंत्रणा सक्षम करणे यावर भविष्यात लक्ष राहील.

गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ व अभ्यासू संचालक असलेल्या डोंगळे यांच्याकडे सोपविली. त्यांनी वर्षभरात सभासद हिताच्या विविध योजना, प्रभावी कामकाज, काटकसरीचा कारभार यावर भर दिला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व आघाडीचे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गोकुळ’ची दिमाखात वाटचाल सुरू असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.

सन २०२३-२४ या डोंगळे यांच्या कारकिर्दीतील ठळक बाबी..

  • वार्षिक दूध संकलनामध्ये प्रतिदिनी सरासरी अडीच लाख लिटर दूध वाढ.
  • १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार.
  • ‘चेअरमन आपल्या गोठ्यावर’ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या १२५ गोठ्यांना प्रत्यक्ष भेट.
  • मुंबईबरोबर पुणे मार्केटमध्ये ‘गोकुळ शक्ती’ टोण्ड दूध तसेच ‘गोकुळ पेढा’ ‘फ्लेव्हर मिल्क या नवीन उत्पादनाची निर्मिती. बासुंदी व दही १ किलो व १० किलो पॅकिंगमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार उपलब्ध.
  • मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरास आर्थिक वर्षात २५० टन तुपाचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली.
  • गोकुळचे तूप व दही पुणे येथील सर्व डी मार्ट स्टोअरमध्ये उपलब्ध.
  • गोकुळच्या नवी मुंबई वाशीतील नवीन दुग्धशाळेची उभारणी (पॅकिंग खर्चात वार्षिक सरासरी रु.१२ कोटीची बचत होणार आहे).
  • सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी (गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६.५० कोटी इतकी बचत होणार आहे).


धोरणात्मक निर्णय

  • ‘गोकुळ श्री’ पुरस्कार १ लाखाचा केला.
  • म्हैस दूधवाढीसाठी जातिवंत म्हैस खरेदी अनुदान ३० हजारांऐवजी ४० हजार
  • वैरण कुट्टीसाठी प्रतिटन १ हजार रुपये अनुदान, तर वैरण बियाणेसाठी ३५ टक्के अनुदान.
  • कर्मचाऱ्यांसाठी सरासरी ५ हजार रुपये वेतनवाढीचा त्रैवार्षिक करार.
  • दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रतिलिटर १० पैसे व संस्था कर्मचारी यांना प्रोत्साहनपर रकमेत प्रतिलिटर ५ पैसे वाढ (वार्षिक १० ते ११ कोटी रुपये)


भविष्यातील योजना

  • भोकरपाडा-खोपोली येथे १५ एकर जागा खरेदी प्रस्तावित.
  • गडमुडशिंगी येथे आयुर्वेदिक औषध कारखाना निर्मिती
  • नवी मुंबई वाशी येथे १५ टन क्षमतेचा दही प्रकल्प उभारणी
  • गोकुळ केसरी स्पर्धेचे आयोजन

Web Title: Gokul to implement incentive scheme for increasing buffalo milk says Arun Dongle 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.