गोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:38 PM2020-08-24T17:38:06+5:302020-08-24T17:42:13+5:30

कोरोनामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून दुधाच्या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. त्यामुळे गोकुळ व वारणा दूध संघांकडे १९२२ टन पावडर व ३३८४ टन बटर पडून असल्याने दूध संघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत चार महिन्यांनंतर पावडरीच्या दरात किलोमागे २५ रुपयांची वाढ झाली असली तरी, त्या पटीत मागणी नसल्याने पावडरीचा उठाव होत नाही.

Gokul, Warna's 1922 tons of powder fell, butter left | गोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणी

गोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणी

googlenewsNext
ठळक मुद्देगोकुळ,वारणाची १९२२ टन पावडर पडून, बटरही शिल्लक राहिल्याने संघापुढे अडचणीचार महिन्यांनंतर दरात प्रतिकिलो २५ रुपयांची वाढ

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोरोनामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून दुधाच्या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. त्यामुळे गोकुळ व वारणा दूध संघांकडे १९२२ टन पावडर व ३३८४ टन बटर पडून असल्याने दूध संघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत चार महिन्यांनंतर पावडरीच्या दरात किलोमागे २५ रुपयांची वाढ झाली असली तरी, त्या पटीत मागणी नसल्याने पावडरीचा उठाव होत नाही.

कोरोनाच्या संकटामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हॉटेल बंद, मिठाईचे उत्पादन ऐन सणासुदीत पूर्ण क्षमतेने नसल्याने दुधाची मागणी घटली. त्यामुळे अतिरिक्त दुधाची पावडर तयार करावी लागली. गोकुळने गाय व म्हशीच्या दुधापासून २१०८ टन पावडर तयार केली. त्यातील म्हशीची ३००, तर गायीची ८०० अशा ११०० टन पावडरीची विक्री झाली असून, अजून एक हजार टन पावडर, तर २५२० टन बटर शिल्लक आहे. वारणा दूध संघाकडे ९२२ टन पावडर, ८६४ टन बटर, तर ४१ टन तूप शिल्लक आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पावडर व बटरच्या मागणी व दरांत घसरण झाली. पावडरीचा दर १५० रुपये किलोपर्यंत खाली आला होता. चार महिन्यांनंतर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दरात थोडी सुधारणा झाली असून, आता १७५ रुपये दर मिळत आहे. मात्र त्या पटीत मागणी नसल्याने राज्यातील दूध संघांकडे सुमारे २५ हजार टन पावडर पडून आहे.

महानंदाचे ४५० टन पावडर निर्मिती

राज्यातील अतिरिक्त दुधापासून पावडर तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. महानंदाच्या माध्यमातून हे दूध खरेदी करून त्याची पावडर तयार केली. आतापर्यंत ४७ लाख लिटर दुधापासून ४५० टन पावडर व २२० टन बटर तयार झाले आहे.

गोकुळचे शासनाकडे ५.७५ कोटी अडकले

गेल्या वर्षी पावडरीच्या निर्यातीसाठी राज्य शासनाने प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. गोकुळने ८५० टन पावडर निर्यात केली. मात्र त्याचे सव्वाचार कोटी निर्यात अनुदान अजून लटकले आहे. त्याचबरोबर महानंदाला पावडर तयार करून दिल्याचे दीड कोटी अडकले आहेत.


जिल्ह्यातील दूध पावडर, बटर, तुपाचा शिल्लक साठा टनांमध्ये -
        दूध संघ       पावडर      बटर         तूप

  • गोकुळ          १०००            २५२०      १३
  • वारणा            ९२२             ८६४        ४१
  • एकूण           १९२२          ३३८४      ५४

 


अतिरिक्त दुधापासून पावडर तयार केल्याने नुकसान होते. गोकुळने हळूहळू पावडर व बटरची विक्री सुरू केली असली तरी अद्याप हजार टन पावडर शिल्लक आहे.
- रवींद्र आपटे,
अध्यक्ष, गोकुळ

Web Title: Gokul, Warna's 1922 tons of powder fell, butter left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.