‘गोकुळ’मधील पडसाद ‘भोगावती’त उमटणार ?
By admin | Published: September 10, 2016 12:47 AM2016-09-10T00:47:18+5:302016-09-10T00:54:38+5:30
चरापले यांच्या भूमिकेकडे लक्ष : शिक्षण मंडळ निवडणुकीतील एकी संपली, शेकापची भूमिका निर्णायक राहणार
बाजीराव फराकटे - शिरगाव -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या सर्वसाधारण सभेचे पडसाद राधानगरी व करवीर तालुक्यांची भाग्यदायिनी असणाऱ्या भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत एकत्र असणारे काँग्रेस-राष्ट्रवादी- शेकाप - शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल अशा युतीतील प्रमुख असणारी शेकापची नेतेमंडळी सत्ताधारी असणाऱ्या माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांच्या विरोधातील आमदार सतेज पाटील यांच्या ‘गोकुळ’ बचाब बरोबर असल्याने या बाबीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. या सभेला राधानगरी व करवीर तालुक्यांतून मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातून सत्ताधारी पॅनेलमधून माजी अध्यक्ष अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक पी. डी. धुंदरे हे नेतृत्व करीत आहेत. तर करवीर तालुक्यातून भोगावती साखर कारखाना परिसरातून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुतणे उदय पाटील (सडोलीकर) हे नेतृत्व करीत आहेत. या तिन्ही संचालकांनी भोगावती परिसरातून सर्वसाधारण सभेला सभासद आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. हा प्रश्न जरी सभेचा असला तरीही येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची याला किनार आहे.
नुकतीच भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या एकत्र पॅनेल विरोधात भाजप, आर.पी.आय., शेतकरी संघटना, रासप, अशी आघाडी झाली होती. यामध्ये महाआघाडीने काँग्रेसच्या आमदार सतेज पाटील समर्थक असणाऱ्या भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या गटाला डावलले. तरीही आमदार पाटील यांच्या सांगण्यावरून चरापले यांना पॅनेलची केलेली व्यूहरचना थांबवावी लागली. चरापलेंच्या नाराजीचा फायदा उठविण्याचा भाजप आघाडीने प्रयत्न केला; पण त्यात त्यांना अपयश आले. तरीही त्यांनी घेतलेली पाच हजारांची मते दुर्लक्षित करता येण्यासारखी नाहीत. सत्ताधाऱ्यांना तो इशाराच होता. या निमित्ताने गावोगावी भाजप पोहोचली आहे.
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळातील सत्ताधारी आघाडीतील प्रमुख पक्ष असणारे शेकाप,
शिवसेनेचे कार्यकर्ते व प्रमुख नेते मंगळवारी पार पडलेल्या ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेत आमदार सतेज
पाटील यांच्याबरोबर ‘गोकुळ बचाव’चा नारा देत होते. यावरून येत्या साखर कारखाना निवडणुकीत ते काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर युती करतात, की सतेज पाटील समर्थक सदाशिवराव चरापले यांच्याबरोबर युती करतात, याला आता महत्त्व आले आहे.
एकंदरीत ‘गोकुळ’च्या सभेचे पडसाद मात्र भोगावती कारखान्याच्या राजकारणात उमटण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. यादृष्टीने चरापले यांनी गावोगावी संपर्क वाढविला आहे.
पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्याने : वादही पेटण्याची चिन्हे
भोगावती परिसरातील साखर कारखान्याच्या बाबतीत तळमळीने प्रश्न मांडणारे श्रीपती पाटील (हसूरकर), माजी जि. प. सदस्य बाबासो देवकर, कारखान्याचे माजी संचालक एकनाथ पाटील, राधानगरी पं. स.चे माजी सदस्य अंबाजी पाटील व इतर प्रमुख मंडळी सतेज पाटील यांच्याबरोबर ‘गोकुळ’च्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पोटतिडकीने बोलत होते. हे कशाचे द्योतक आहे. हे जनतेला आता समजून चुकले आहे.
याच सभेत आमदार सतेज पाटील यांना भोगावती परिसरातील एक दिग्गज नेते व कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह डोंगळे यांनी लक्ष्य केल्याने व आमदार पाटील यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिल्याने हा वादही पेटण्याची चिन्हे आहेत. डोंगळे यांचे चिरंजीव, युवा नेते धीरज डोंगळे यांनी या वादात वडिलांची बाजू घेऊन आमदार पाटील यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने आगामी साखर कारखाना निवडणुकीत डोंगळे गट काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील यांच्या बरोबरच राहणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तर शेकाप राष्ट्रवादीबरोबर युती कायम ठेऊन सत्तेची चव चाखतो, की नव्या भिडूबरोरबर युती करून जुने सहकारी असणाऱ्या चरापले यांच्याबरोबर जुळवून घेतो, यालाही मोठे महत्त्व आले आहे.