‘गोकुळ’च्या पाच वर्षांत दोन हजार कोटींच्या ठेवी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:09+5:302021-08-17T04:28:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये ३३ वर्षांची सत्ता घालविणे सोपे नव्हते, दूध उत्पादकांनी आमच्यावर विश्वास दाखवत दिलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये ३३ वर्षांची सत्ता घालविणे सोपे नव्हते, दूध उत्पादकांनी आमच्यावर विश्वास दाखवत दिलेली सत्ता कोणावर सूड उगवायचा, निंदानालस्ती किंवा राजकीय आकसापोटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी नाही. पहाटेपासून शेणा-मुतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाला दाम देण्यासाठी सत्तेचा वापर करणार असून येत्या पाच वर्षांत ‘गोकुळ’दोन हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा पार करेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने साेमवारी ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीच्या धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, सहकारात संघटितपणे काम केल्यानंतर ताकद कशी वाढते, हे दूध संस्था कर्मचारी संघटनेने दाखवून दिले आहे. संघटना मोठी आहे, तुमची सहानुभूती टिकवायची असेल तर दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. संस्था पातळीवर शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्या, त्यांना म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहित करा. एकीकडे म्हैस दूध वाढवत असताना २५ टक्के जादा गाय दूध विक्रीचे उद्दिष्ट मुंबई, पुण्यातील वितरकांना दिले आहे. उपपदार्थाचे उत्पादन वाढविणे हा पुढचा टप्पा असून परवाची दूध खरेदी दरात वाढ करताना भेदभाव केला नाही. मात्र, आगामी काळात केवळ म्हैस दुधालाच जादा दर दिला जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
दूध संस्था संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय बोळावे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, संचालक उपस्थित होते.
मग सचिवांकडे ‘लक्ष्मी’ भरपूर आली असावी
दूध संस्था कर्मचाऱ्यांची संख्या पाहता, ही संघटना महत्त्वाची असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावर २०० ठराव कर्मचाऱ्यांच्या नावावर असल्याचे मंत्री सतेज पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. मग निवडणुकीत ‘लक्ष्मी’ भरपूर आली असावी, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला.
बंटी आणि आपण दहा-दहा म्हशी घेणार
म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच अनुदानही देणार आहे. याबाबत लवकरच आपण व सतेज पाटील गुजरातला जाणार आहे. तेथून दोघेही दहा-दहा ‘म्हैसाणा’ म्हशी घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
‘गोकुळ’चा पाया हलला नाही
गेल्या वीस वर्षांत प्रतिस्पर्धानी आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूध संस्थांच्या माध्यमातून उत्पादकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाल्याने ‘गोकुळ’चा पाया कोणी हलवू शकला नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
सर्व असंघटित कामगारांचे एकच महामंडळ करणार
विविध प्रकारच्या असंघटित कामगारांची महामंडळे करा, अशा मागण्या येत आहेत. यासाठी सर्वच असंघटितांचे एकच महामंडळ करून त्यातून न्याय देता येईल का, याबाबत शासन स्तरावर विचार सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.