‘गोकुळ’ची बल्क कुलर योजना फायद्याची

By Admin | Published: June 16, 2016 12:23 AM2016-06-16T00:23:01+5:302016-06-16T01:00:28+5:30

प्रबोधनाची गरज : उत्पादकांना २० पैसे प्रतिलिटर जादा दर; गुणवत्ता वाढीबरोबर दूध जप्त होण्याच्या प्रकाराला बसणार आळा

Gokul's bulk cooler scheme is beneficial | ‘गोकुळ’ची बल्क कुलर योजना फायद्याची

‘गोकुळ’ची बल्क कुलर योजना फायद्याची

googlenewsNext

प्रकाश पाटील -- कोपार्डे --मानांकनाप्रमाणे दुधाची गुणवत्ता व दर्जा राखल्याशिवाय स्पर्धेच्या काळात दूध विक्री व्यवस्था टिकणार नाही, हे लक्षात आल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख गोकुळ दूध संघाने बल्क कुलर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा दूध उत्पादकांना थेट आर्थिक फायदा देण्याचा हेतू असल्याचा संघ दावा करीत असताना याला गावोगावच्या दूध संस्था मात्र विरोध का करीत आहेत? याचे गौडबंगाल समजण्यापलीकडचे आहे.
दूध व्यवसाय हा ग्रामीण भागाशी निगडित असणारा व्यवसाय आहे. ज्या गावांमध्ये १००० लिटरपासून पाच हजार लिटरपर्यंत दूध संकलन करण्याची क्षमता आहे, अशा गावांना ‘गोकुळ’ने प्राधान्य देत राष्ट्रीय दुग्धशाळा महामंडळ (एनडीडीबी) यांच्या सहकार्याने दूध संकलनाचे केंद्रीकरण करून त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांना व्हावा, हा हेतू समोर ठेवला आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या संस्थांनी दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा दर देण्याचे धोरणही ‘गोकुळ’ने जाहीर करीत ते अमलात आणले आहे. यापुढे जाऊन बल्क कुलरमुळे गावातच दुधाची साठवणूक करून गुणवत्ता व दर्जा टिकविण्याबरोबर वजन व त्याची नोंदही अद्ययावत यंत्रणेमार्फत करण्याची सोय असल्याने हेराफेरीला थारा नाही. लगेच सर्व नोंदी त्वरित मुख्यालयाकडे ब्रॉडबँडने पाठविल्या जात असल्याने दूध बिलांची बिनचूक देवघेव होईल. तसेच दूध घटीच्या असणाऱ्या दूध उत्पादकांच्या तक्रारी कमी होणार आहेत. गाय व म्हशीचे दूध काढल्यानंतर त्याचे तापमान ३२ ते ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. ते दूध संस्थेतून संघापर्यंत पोहोचविण्यास विलंब झाल्यास नासण्याचे प्रमाण असते. मात्र, बल्क कुलरमुळे हे दूध चार डिग्री सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवण्यात येऊ शकते. त्यामुळे नासके दूध म्हणून संस्थांचे जप्त होणारे दुधाचे प्रमाण शून्यावर येणार आहे.
बल्क कुलरमुळे गावागावांमध्ये सकाळी, सायंकाळी एकत्रित संकलित होणारे दूध दोन ते तीन दिवसांतून एकदा इन्सुलेटेड टँकरमधून ‘गोकुळ’ संघापर्यंत पोहोच करता येऊ शकते. त्यामुळे वाहतूक खर्चाची बचत, कॅनमधून वाहतूक करताना होणारी दुधामधील घट कमी होणार असून, मजुरीवरील खर्चात बचत होण्याबरोबर दुधाचा दर्जा मानांकनाप्रमाणे टिकविता येणार आहे. दुधातील बल्क कुलरमुळे बॅक्टेरिया कमी झाल्याने दुधाची नैसर्गिक प्रत, चव व गोडवा कायम राहणार आहे. उत्तम प्रतीचे व जंतूविरहित दूध व इतर पदार्थांमुळे आंतरराष्ट्रीय मानांकन राखल्याने परदेशी बाजारपेठा काबीज करण्यास स्पर्धकांना तोंड देता येणार आहे. दुधातील भेसळ हा मुख्य धोका थांबून दुधाची तूटही रोखता येणार आहे.
मात्र, याला गावागावांतील दूध संस्थांकडून विरोध होत असून, हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गावांतच बल्क कुलर योजना सुरू आहे. या गावांतही सर्व संस्थांनी सहभाग नोंदविला नसून, बल्क कुलर म्हणजे दूध संस्थांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काही संस्थांच्या संचालकांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.
यात या संस्थांनी दूध संकलनात मिळणारी वाढ मिळणार नसल्याने संस्थेच्या आर्थिक ताळेबंदावर परिणाम होऊन संस्था बंद पडण्याची शक्यता वर्तविली. ज्या संस्थेत हा बल्क कुलर प्रकल्प राबविला
जात आहे, अशा गावांतील एकाच संस्थेचा फायदा होणार आहे, असा संस्थांचा दावा आहे. याचबरोबर प्रत्येक संस्थेतील सेवकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडणार असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे भविष्यात संस्था नामशेष होण्याची भीतीही संस्थाचालकांनी बोलून दाखविली.


वाहतुकीतही बचत :
बल्क कुलरमुळे गावातच दुधाची साठवणूक करून गुणवत्ता व दर्जा टिकविण्याबरोबर वजन व त्याची नोंदही अद्ययावत यंत्रणेमार्फत करण्याची सोय
दूध बिलांची बिनचूक देवघेव
कॅनमधून वाहतूक करताना होणारी दुधामधील घट कमी होणार

Web Title: Gokul's bulk cooler scheme is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.