‘गोकुळ’च्या निवडणुकीचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:49+5:302021-03-13T04:41:49+5:30
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार की नाही ते आज, शुक्रवारी ठरणार आहे. आज, गुरुवारी ‘गोकुळ’चे ...
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार की नाही ते आज, शुक्रवारी ठरणार आहे. आज, गुरुवारी ‘गोकुळ’चे वकील आजारपणामुळे गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही, ती आज होणार आहे. दरम्यान, अंतिम मतदार यादीदेखील आज प्रसिद्ध होणार असल्याने याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसंदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित करावी, अशी मागणी केली आहे. आज सुनावणी होत असताना विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या सूचनेनुसार प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत. याआधी हरकतीची सुनावणी व निकाल पूर्ण झाल्याने आज प्रसिद्ध होणारी मतदार यादी ही अंतिम असणार आहे. यात बदल होणार नाही.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी ३६५९ ठराव दाखल झाले होते. यादीत नाव समाविष्ट करण्याच्या मागणीचे ११, तर बदलासाठी आलेल्या १३ अशा २४ हरकती फेटाळल्या. एकाच संस्थेचे दुबार आलेले २५ अशा एकूण ४९ हरकती फेटाळल्या असून, ३६५० पात्र अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.