‘गोकुळ’ची दरवाढ बुधवारपासून शक्य
By Admin | Published: June 5, 2014 01:08 AM2014-06-05T01:08:40+5:302014-06-05T01:31:19+5:30
म्हैस व गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया, तर विक्री दरात दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, दरवाढीची अंमलबजावणी ११ जूनपासून केली जाण्याची शक्यता आहे. ‘अमूल’ने मुंबई येथील मार्केटमध्ये विक्री दरात वाढ केल्याने ‘गोकुळ’ने हा निर्णय घेतला आहे. म्हैस व गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया, तर विक्री दरात दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. ‘अमूल’ दूध संघाने गायीच्या विक्री दरात वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांत डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर पशुखाद्याचे वाढलेले दर व दुभत्या जनावरांच्या दरात झालेली वाढ पाहता दूध व्यवसाय उत्पादकांच्या हाताबाहेर गेल्याने खरेदी दरातही वाढ करण्याची मागणी दूध उत्पादक शेतकर्यांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस ‘गोकुळ’च्या संचालक मंडळात दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्यासाठी चर्चा सुरू आहे. याबाबत संचालकांनी प्रशासनाकडून किती दरवाढ करावी, याची माहिती घेतली आहे. शनिवारी (दि. ७) संचालक मंडळाची बैठक होत आहे. यामध्ये दरवाढीचा निर्णय अपेक्षित आहे. मागील दरवाढीमध्ये संघाने खरेदी दरात दीड रुपयांची, तर विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली होती. अशाच पद्धतीने दरवाढ होण्याची शक्यता आहे.