‘गोकूळ’ची सभा यंदा ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:44+5:302021-08-28T04:27:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकूळ) वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकूळ) वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी होत आहे. ही सभा यंदा ऑनलाइन होणार असून संलग्न प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींकडून मोबाइल क्रमांक मागवले आहेत.
‘गोकूळ’मधील सत्तांतरानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा होत आहे. संघाच्या मागील चार-पाच सर्वसाधारण सभेत विराेधक व सत्तारूढ गट आमनेसामने आले होते. कारभारावर जोरदार प्रहार करत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाला कोंडीत पकडले होते. त्यातून संघर्ष उफाळून आला होता. पाच वर्षे केलेल्या संघर्षाचे फळ म्हणून सभासदांनी त्यांच्याकडे सत्तेचे सुकाणू सोपवले आहे. त्यानंतर ही पहिलीच सभा होत आहे. ही सभा २०२०-२१ या आर्थिक वर्षातील आहे. हा कारभार जुन्याच संचालक मंडळाच्या कारकिर्दीतील असल्याने येथे फार ताणाताण होणार नाही. त्यात कोराेनामुळे सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यासाठी ‘गोकूळ’ने संलग्न संस्थांच्या प्रतिनिधीकडून मोबाइल क्रमांक मागवले आहेत. संघाच्या सुपरवायझरकडे मंगळवार (दि. ३१) पर्यंत ही माहिती देण्याचे आवाहन ‘गोकूळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे.