‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद
By admin | Published: June 5, 2017 01:14 AM2017-06-05T01:14:57+5:302017-06-05T01:14:57+5:30
‘गोकुळ’चे दूध संकलन आज बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र आणि कोल्हापूर बंदला दूध संकलन सकाळी व सायंकाळी बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास नारायण पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी रविवारी रात्री जाहीर केला. या निर्णयामुळे ‘गोकुळ’चे आजचे संकलन ठप्प होणार असले तरी कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या संपात पहिल्याच दिवशी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी दूध संघाने संकलन बंद ठेवून पाठिंबा दिला होता. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा संघ आहे आणि शेतकरी बांधव संपात उतरले असल्याने ‘गोकुळ’नेही या संपाला संकलन बंद ठेवून जाहीर पाठिंबा द्यावा, अशी मागणी विविध शेतकरी नेत्यांकडून झाली होती. त्याशिवाय अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून ‘गोकुळ’चे लाख, सव्वा लाख लिटर दूध संकलन कमी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत संप मागे घेण्यात आल्याची घोषणा झाली; परंतु त्याबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे आजच्या बंदला शेतकऱ्यांतूनच जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून रविवारी दिवसभर ‘गोकुळ’ने संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा द्यावा, असा दबाव सोशल मीडिया व चर्चेतूनही वाढला. त्याची दखल घेऊन संघाने संकलन बंद ठेवून संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
उद्या वितरणावर परिणाम शक्य
‘गोकुळ’चे सध्या प्रतिदिन नऊ लाख लिटर संकलन होते. ते आज होणार नाही. परंतु, आज कोल्हापूर शहरातील दूध वितरणावर मात्र याचा परिणाम होणार नाही. सोमवारचे संकलन बंद राहिल्याने कोल्हापूरसह पुणे, मुंबईच्या दूध वितरणावर मात्र मंगळवारी परिणाम होईल. मुंबईला प्रतिदिन सात लाख लिटर, तर पुण्याला पावणेदोन लाख लिटर दूध पुरवठा होतो.