‘गोकुळ’च्या दूध संकलनात २.१३ लाख लिटरची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:13+5:302020-12-17T04:47:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या (गोकुळ) दूध संकलनात डिसेंबर महिन्यात मोठी वाढ झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या (गोकुळ) दूध संकलनात डिसेंबर महिन्यात मोठी वाढ झाली आहे. दैनंदिन संकलन १४ लाख २७ हजार लिटरपर्यंत पोहोचले असून, गतवर्षीपेक्षा दोन लाख १३ हजार लिटर वाढले आहे. म्हैस दुधातही वाढ झाली असून, आता म्हैस व गाय दूध संकलनाचा रेशो ५०:५० टक्क्यांवरून ५५:४५ टक्के झाला आहे.
गेल्या वर्षी महापूर आणि अतिवृष्टीमुळे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत ओल्या चाराचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर बनला होता. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर झाला होता. साधारणता ऑक्टोबरपासून दुधाचा पुष्ठकाळ सुरू होतो. त्यामुळे ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत दुधाचे उत्पादन वाढत राहते. त्यानंतर हळूहळू कमी होते. मात्र, गेल्या वर्षी कोल्हापुरातीलच नव्हे, संपूर्ण राज्यातील दूध उत्पादनात मोठी घट झाली होती. ऐन पुष्ठकाळात ‘गोकुळ‘ दूध संघाचे संकलन १२ लाख लिटरपर्यंत खाली आले होते. परिणामी नियमित दूध विक्रीची गरज भागविताना दमछाक उडाली होती.
यंदा पाऊस भरपूर झाला, त्यात ‘गोकुळ’चा म्हैस व गायीचा दूध दर तुलनेत अधिक असल्याने दूध वाढ गतीने झाली. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी गाय व म्हशीचे दूध समान होते. मात्र, आता म्हशीचे दूध वाढू लागले आहे. गत वर्षीपेक्षा म्हैस दुधात ५० हजार लिटर, तर गाय दुधात एक लाख ६३ हजार लिटर दुधाची वाढ झाली आहे. विक्रीतही प्रतिदिनी ८३ हजार लिटरची वाढ झाली असून, सध्या ४२ लाख २६ हजार ४५२ लिटर विक्री होते.
दूध वाढीची ही आहेत कारणे -
चाऱ्याचे मुबलक उत्पादन
उच्चांकी म्हैस व गाय दूध दर
लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेल्याने तरुण मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळले.
अशी झाली ‘गोकुळ’ची दूध वाढ, लिटरमध्ये-
महिना म्हैस, गाय
डिसेंबर २०१९ ७.३७ लाख ४.७७ लाख
डिसेंबर २०२० ७.८७ लाख ६.४० लाख
- राजाराम लोंढे