कोल्हापूर पूर: गोकुळचे दूध संकलन बंद, महापुरामुळे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:22 PM2019-08-06T16:22:35+5:302019-08-06T16:23:36+5:30
कोल्हापूर पूर: गोकुळकडून दररोज साडेनऊ ते दहा लाख लिटर दूधाचे संकलन होते.
कोल्हापूर : कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीला महापूर आला आहे. इतर नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यामुळे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दमदार पावसाने जिल्ह्यातील पूर संकट सर्वदूर पसरल्याने राज्य, जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. 87 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर, पावसामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी संघाना दूध संकलनाचा फटका बसला आहे. दूध वाहतुकीस अडचण होत असल्याने गोकुळने संकलन थांबविले आहे.
गोकुळकडून दररोज साडेनऊ ते दहा लाख लिटर दूधाचे संकलन होते. पण गेल्या काही दिवसात पावसाने जिल्ह्याला झोडपल्याने संकलनावर परिणाम झाला आहे. पर्यायी मार्गाने दूध संकलन करण्यात येत होते. मात्र, तेही आता पुरामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध संकलन बंद झाल्याने ग्रामीण भागात घरोघरी असलेल्या दुधाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांतील काही गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.