गोकुळचे मुंबई, पुण्यातील दूध वितरण सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 11:39 AM2020-07-23T11:39:21+5:302020-07-23T11:41:24+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० हजार लिटरने दूध विक्री कमी झाली आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (दि. २१) केलेल्या राज्यव्यापी दूध आंदोलनाचा बुधवारी मुंबई व पुणे मार्केटमध्ये फारसा परिणाम दिसला नाही. गोकुळसह सर्वच दूध संघांनी अगोदरच त्याची तजबीज करून ठेवल्याने टंचाई भासली नाही. कोल्हापुरात मात्र लॉकडाऊनमुळे १० हजार लिटरने दूध विक्री कमी झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये व दूध पावडरीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी दूध बंद आंदोलन केले होते. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार लिटर दूध घरांतच राहिले.
जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असणाऱ्या ह्यगोकुळह्यचे दूध संकलन ५५ हजार ५९७ लिटरनी कमी झाले होते. त्यामुळे मुंबई व पुणे बाजारपेठांवर त्याचा बुधवारी परिणाम होणार असे वाटत होते. मात्र दूध संघांनी अगोदरच त्याची तजवीज केल्याने अपेक्षित टंचाई भासली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा परिणाम मात्र दूध विक्रीवर झाला आहे. गोकुळ दूध संघाची रोज १० हजार लिटरने दूध विक्री कमी होत आहे.
कोरोनाचा गोकुळलाही फटका
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा थेट परिणाम दूध संकलनावरही झाला आहे. गोकुळचे बुधवारी सकाळच्या पाळीत २१०० लिटर दूध कमी आले. यामध्ये मुख्य प्रकल्प येथे १९००, लिंगनूर (ता. कागल) येथे २०० लिटर संकलन कमी झाले.