‘गोकुळ’चे ठरावधारक सज्जन तोडकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:53+5:302021-04-30T04:31:53+5:30
गडहिंग्लज : जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते व गोकुळ दूध संघाचे ठरावधारक सज्जन विठोबा तोडकर (वय ७२, रा. शेंद्री, ता. ...
गडहिंग्लज : जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते व गोकुळ दूध संघाचे ठरावधारक सज्जन विठोबा तोडकर (वय ७२, रा. शेंद्री, ता. गडहिंग्लज) यांचा गुरुवारी (दि. २९) सायंकाळी कोरोनाने मृत्यू झाला. गोकुळचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना कोरोनाने जिल्ह्यातील तिसऱ्या ठरावधारकाचा बळी घेतला.
रविवारी (२५ एप्रिल) रोजी तोडकर यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, तीन भाऊ, दोन बहिणी,नातवंडे असा परिवार आहे. शेंद्रीच्या माजी सरपंच लीलाताई तोडकर यांचे ते पती होत.
गडहिंग्लज व आजरा साखर कारखान्यात मुख्य शेती अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. शेंद्री येथील श्री महालक्ष्मी दूध संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. तसेच गावातील विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. गडहिंग्लज येथील स्मशानभूमीत रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.