गोकुळचा ठरावधारक घरात, गडी शेतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:32+5:302021-04-19T04:21:32+5:30
गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी ...
गारगोटी : गोकुळच्या निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढला आहे. भेटीगाठीसाठी उमेदवार, नेते मंडळी येत असल्याने या पूर्वीच्या निवडणुकीत कोणाच्याही खिजगणतीतही नसणारा ठरावधारक यावेळी महत्त्वाचा घटक झाला आहे. आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी ठरावधारकांनी शेतातील कामासाठी चक्क मजूर लावून आपण मात्र घरीच बसला आहे. जेणेकरून भेटायला येणाऱ्या संभाव्य उमेदवार आणि नेत्यांची गैरसोय होऊ नये. ठरावधारकांच्या भेटीगाठी घेण्याच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. टप्प्यात येणारे सावज टिपण्यासाठी ठरावधारक नेम धरून बसला आहे.
माघारीनंतर या महाविकास आघाडीतील नाराजांना आपलेसे करण्यासाठी सत्ताधारी आघाडी सावध पवित्र्यात आहे. नेतेमंडळी बेरजेचे गणित करण्यात गुंतली आहेत.
यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकाला फारसे महत्त्व नसायचे. एकतर्फी होणारी निवडणूक ही सत्ताधारी आघाडीची मक्तेदारी झाल्यासम होती. घराणेशाही आणि सतत तीच मंडळी सत्तेत सहभागी झाल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्याऐवजी केवळ मतदानाची संधी मिळत होती. गोकुळमधील नोकरभरती लाख मोलाची ठरली. गरीब शेतकऱ्यांच्या दुधावर चाललेल्या संघात त्याच्या तरुण बेरोजगार तरुणाला नोकरी मिळाली नाही. ती मिळाली लाखो रुपयांची ओळख असलेल्या बापाच्या मुलाला !, अशा अनेक घटनांची खदखद मनात होती. कोणताही पर्याय नसल्याने तेही मूग गिळून गप्प बसून होते; पण गत निवडणुकीत मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आघाडीतील उमेदवारांचा निसटता पराभव झाल्याने यावेळी ठरावधारकांची खात्री झाली की सत्ताधारी आघाडीच्या विरोधात एक भक्कम पर्याय दिसू लागला.
भुदरगड तालुक्यात ३७३ ठरावधारक आहेत. यातील काही ठरावधारकांनी संभाव्य उमेदवार आणि जिल्ह्याचे नेते मंडळी भेटण्यासाठी येत आहेत म्हणून शेतातील कामासाठी पगारी मजूर नेमून आपण घरी थांबले आहेत. येईल त्या नेत्याला आणि उमेदवाराला भेटत आहेत. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने ठरावधारकांचे आधारकार्ड घेण्याचा सल्ला तालुकास्तरीय नेत्यांना दिला, तर काही बहाद्दर ठरावधारकांनी चार-पाच रंगीत झेरॉक्स (प्रति) काढून ठेवल्या आहेत.
हे वातावरण पाहता आघाडीतील सर्व उमेदवारांना मतदान होण्यासाठी दोन्ही आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीमध्ये परस्पर विरोधी पक्षनेते एकत्र आल्याने "नवरा मेला तरी चालेल; पण सवत विधवा झाली पाहिजे !" या म्हणीप्रमाणे ठरावधारकांनी उचल खाल्ल्यास सगळ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.