‘गोकूळ’चे तीन वर्षांत सात लाख लिटरचे उद्दिष्ट आव्हानात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:39+5:302021-06-10T04:16:39+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या नूतन संचालक व नेत्यांनी तीन वर्षांत २० लाख लिटर दूध संकलनाचा ...

Gokul's target of seven lakh liters in three years is challenging | ‘गोकूळ’चे तीन वर्षांत सात लाख लिटरचे उद्दिष्ट आव्हानात्मक

‘गोकूळ’चे तीन वर्षांत सात लाख लिटरचे उद्दिष्ट आव्हानात्मक

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’च्या नूतन संचालक व नेत्यांनी तीन वर्षांत २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याची घेतलेली शपथ सत्यात उतरताना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादनाची क्षमता, म्हशींचा भाकड काळ आणि दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सध्या तरी हे आव्हान पेलणे ‘गोकूळ’च्या दृष्टीने अशक्यप्राय आहे.

‘गोकूळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर वीस लाख लिटर दूध संकलनाचे शिवधनुष्य नेत्यांनी उचललेले आहे. जिल्ह्यात सध्या रोज २१ लाख लिटर दूध उत्पादन आहे, त्यापैकी ‘गोकूळ’कडे ९ लाख ५० हजार लिटर दूध येते. उर्वरित दूध इतर संघ, खासगी विक्री व घरगुती वापरासाठी जाते. जिल्ह्यात साडेसहा लाख दूध उत्पादक आहेत, त्यापैकी ३ लाख ९६ हजार ‘गोकूळ’कडे आहेत. जनावरांचा भाकड काळ धरून एक उत्पादक दिवसाला सरासरी ३ लिटर दूध उत्पादन करतो. शेतकऱ्यांकडे अजून उत्पादकता वाढीचा वाव असला तरी अडचणी अनेक आहेत. मुळात दुधाचा दर हा अस्थिर आहे, मात्र त्यापटीत पशुखाद्य दरातील वाढ थांबत नाही. त्यात दुभत्या जनावरांच्या किमती भरमसाठ वाढल्याने उत्पादन खर्च आवाक्याच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे अलिकडील पाच-सात वर्षांत दूध उत्पादन ज्या गतीने वाढणे अपेक्षित होते, ते वाढलेले नाही. त्यामुळेच हे शिवधनुष्य पेलणे तसे आव्हानात्मक आहे.

‘वासरू संगोपना’मुळेच दूधात वाढ

‘गोकूळ’ने वासरू संगोपन याेजना राबवल्याने त्यांचे फलित आता दिसत आहे. आताच्या दूध संकलनात या योजनेचे योगदान खूप मोठे आहे.

मागील सहा वर्षांत तीन लाख लिटरची वाढ

‘गोकूळ’चे १९६४ ते २०२० पर्यंत वार्षिक संकलन बघितले तर ५८ वर्षात ५१ लिटर वरून १० लाख ६७ हजार लिटरपर्यंत झेप घेतली. खऱ्या अर्थाने १९९५ पासून दूध संकलनात गतीने वाढ होत गेली. २००४ पासून पुढील सोळा वर्षात दुप्पट संकलन वाढले. मात्र २०१४ ते २०२० या कालावधीत अवघे तीन लाख लिटरच संकलन वाढल्याचे दिसते, यावरून जिल्ह्याची उत्पादकता वाढीचा वेग लक्षात येतो.

तर रोज १३६ गायी-म्हैशी खरेदी कराव्या लागतील

संघाने वर्षाला तीन लाख लिटर संकलन वाढवायचे ठरवले तर वर्षात ५० हजार म्हणजे रोज १३६ म्हैस, गायी खरेदी कराव्या लागणार आहेत. एवढे पशुधन आणायचे कोठून? आणले तर त्याचे संगोपन होणार का? असे अनेक प्रश्न आहेत.

बाहेरील दुधावरच राहणार मदार

‘गोकूळ’कडे सध्या सांगली व सीमाभागातील रोज तीन लाख लिटर दूध येते. कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाची उत्पादकता वाढली तर ५० हजार लिटरपेक्षा पुढे जाणार नाही. त्यामुळे लक्ष्य गाठण्यासाठी संघाची मदार बाहेरील दुधावरच राहणार आहे.

संकलनाचे दहा वर्षांचे टप्पे

वर्ष संकलन प्रतिदिन लिटर

१९६४ ५१

१९७४ २४ हजार ४३१

१९८४ १ लाख ४ हजार ४१९

१९९४ ३ लाख ७३ हजार ७१

२००४ ५ लाख ३ हजार ८२१

२०१४ ७ लाख ५७ हजार ६९२

२०२० १० लाख ६७ हजार ६३८

संकलन वाढीतील अडचणी अशा -

जनावरांचा भाकड काळ

दूध दरातील अनिश्चितता

वाढते पशुखाद्य व वैरणीचे दर

दुभत्या जनावरांचे वाढलेले दर

पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट करून पदरात शेणच पडत असल्याची उत्पादकांची भावना.

कोट-

वर्षाला तीन लाख लिटर दूध वाढ करणे तसे आव्हानात्मक आहे. तरीही संचालक मंडळाने निर्धार केला चांगली गोष्ट आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यापासून संचालकांची इच्छाशक्ती, योग्य नियोजन व त्याची अंमलबजावणी केली तर उद्दिष्टाच्या जवळपास पोहचू शकतात.

- अरुण नरके (माजी अध्यक्ष, गोकूळ)

दूधवाढीसाठी हे करायला पाहिजे-

दूधवाढीचा काल ------------ कार्यक्रम आखला पाहिजे

परराज्यातील (हरयाणा, पंजाब) म्हशीच्या उत्पादकाला व्यवस्थापन प्रशिक्षण.

दर्जेदार पशुखाद्याबरोबरच कसदार चारा उत्पादन

अत्याधुनिक पशुवैद्यकीय सेवा

जातिवंत वासरांसाठी सीमेन (वीर्यमात्रा)

Web Title: Gokul's target of seven lakh liters in three years is challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.