कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:36 AM2019-11-21T00:36:35+5:302019-11-21T00:36:39+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत ...

Gol deals go out in Kolhapur, rates fall | कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

Next

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत झाले; पण दरात मात्र क्विंटलमागे २०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. अडते, हमालांच्या वादात गूळ उत्पादक शेतकरी मात्र भरडला गेला असून, त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
अडत्यांकडून १० टक्के हमाली दरवाढीच्या मागणीसाठी गेल्या शनिवारपासून बाजार समितीत आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी सौदा निघाला तरी ३६ हजार रवे शिलाई न केल्याने तसेच पडून राहिले. रविवार (दि. १७) च्या बैठकीत तोडगा निघाला असे गृहीत धरून सोमवारी (दि. १८) आणखी तीन हजार गूळ रव्यांची बाजारात आवक झाली; पण हमाल आणि अडत्यांच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने सोमवारी सौदेच निघाले नाहीत. मंगळवारीही (दि. १९) गुंता कायम राहिल्याने सौद्यासाठी माल आलाच नाही.
मंगळवारी रात्री तोडगा निघाल्याने बुधवारी सकाळी सौदे पूर्ववत झाले. ९०६९ गूळरव्यांची नव्याने आवक झाली; तर शनिवार ते सोमवार या कालावधीत समितीत आलेल्या १०२९३ गूळरव्यांची विक्री झाली. अजूनही १८ हजार ३८६ रवे शिल्लक असून, त्यांचा सौदा आज, गुरुवारी होणार आहे.
दरम्यान, सौदे पूर्ववत झाले पण दरात मात्र घसरण झाली आहे. सरासरी दर ३४०० ते ३५०० रुपये असा स्थिर राहिला असला तरी सर्वांत कमी प्रतीच्या गुळाचा दर २०० रुपयांनी कमी होऊन तो २८०० रुपये क्विंटलवर आला आहे. शनिवारी हाच दर ३००० ते ३१०० रुपये होता. हीच परिस्थिती एक नंबरच्या गुळाची आहे. शनिवारी सरासरी ४५०० ते ४८०० रुपये असणारा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कमाल दरात ४०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. एक किलो गुळाचे ९२०० बॉक्स सौद्याला होते. त्याच्याही दरात १०० रुपयांची घसरण झाली.
गुळाच्या दर्जानुसार रोजचे दर बदलत असतात; पण हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने ४००० रुपये क्विंटलच्या वर असणारे दर आता मात्र त्याच्याही खाली आल्याने गूळ उत्पादकांची अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे. अडते आणि हमालांच्या वादात शेतकरी नाहक भरडला गेल्याने आता गुळ उत्पादकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, बाजार समितीचे बोटचेपे धोरणच याला कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावर
चार दिवसांनंतर सौदे सुरू झाल्यामुळे आनंद वाटला; पण प्रत्यक्षात सौदे सुरू झाल्यानंतर अडते, व्यापाऱ्यांकडून लूटच सुरू झाली. जो गूळ शनिवारी किमान ३६०० रुपये क्विंटलने विकला गेला होता, तोच गूळ आता ३१०० ते ३२०० रुपयांना द्यावा लागला. मुळातच ३८०० ते ३९०० रुपये किमान भाव मिळाला तर ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर गुºहाळघर चालविता येते. आता त्याच्याही खाली दर आल्याने गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावर आला आहे.
- राजू पाटील,
गूळ उत्पादक, निगवे, ता. करवीर

Web Title: Gol deals go out in Kolhapur, rates fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.