सोने-चांदी खरेदीत घट; सराफ उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:06 AM2018-07-09T00:06:01+5:302018-07-09T00:06:06+5:30

Gold and silver prices fall; Shot in the industry | सोने-चांदी खरेदीत घट; सराफ उद्योगाला फटका

सोने-चांदी खरेदीत घट; सराफ उद्योगाला फटका

Next

इंदुमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘एक देश-एक कर’ या उद्देशाने केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीमुळे सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे. जीएसटीमुळे चोख सोन्यासह दागिन्यांवर दोन टक्क्यांनी वाढीव कर लागल्याने त्याचा फटका सराफ उद्योगाला बसला आहे. दुसरीकडे, एका वर्षानंतरही ग्राहकांच्या मनात कराबद्दल संभ्रम आहे.
जीएसटी लागू होण्यापूर्वी सोन्या-चांदीवर १.२ टक्के व्हॅट आकारला जात होता शिवाय जुने दागिने देऊन नवे दागिने बनविल्यानंतर त्यावर कोणताही कर आकारला जात नव्हता. मात्र, गतवर्षी केंद्राने सोन्या-चांदीवर तीन टक्के जीएसटी लावल्यानंतर आपसूकच सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. या करापोटी ग्राहकांना जास्तीच्या १.८ म्हणजे जवळपास दोन टक्क्यांनी वाढीव कर भरावा लागत आहे.
पूर्वी ग्राहकाने आपल्याकडील जुने सोने देऊन, नवा दागिना बनवून घेण्यावर कोणताही कर आकारला जात नव्हता. आता मात्र अशा दागिन्यांच्या मजुरीवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. शिवाय नव्या दागिन्यांवरही कर आकारला जातो. त्यामुळे दागिने घडवून घेणे ही बाबदेखील खर्चिक झाली आहे. आजही अनेक लोक गुंतवणूक किंवा भविष्यात वाढीव परतावा देणारी वस्तू म्हणून चोख सोन्याची खरेदी करतात. मात्र या गुंतवणुकीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने तोही एक फटका बसला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीत घट झाली आहे.
हे सगळे खरे असले तरी सुवर्णालंकार हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढल्याचा परिणाम काही दिवस बाजारपेठेवर जाणवतो आणि पुन्हा तो सुरळीत होतो. आता कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर आपल्याला जीएसटी द्यावा लागणार, हे ग्राहकांनीही स्वीकारले आहे; पण अजूनही या व्यवसायावरील जीएसटीबाबत ग्राहकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आहे. जीएसटी लागू होऊन वर्ष झाल्यानंतरही हीच स्थिती कायम असल्याने ग्राहकांकडूनही सावधगिरीने सोन्या-चांदीची खरेदी केली जात आहे.
छोट्या व्यावसायिकांचा कस
या सगळ्या बदलांमध्ये पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करीत असलेल्या सराफ व्यावसायिकांचा कस लागत आहे. मोठे अथवा ब्रॅँडेड ज्वेलर्स जीएसटीच्या नियमांनुसार सॉफ्टवेअर, दागिन्यांच्या नोंदी, आॅडिट, अकौंटिंग या सगळ्या नोंदी चोखपणे ठेवू शकतात. मात्र, लहान व्यावसायिकांच्या दृष्टीने हे जिकीरीचे आहे. ग्राहकांची आवड, या क्षेत्रातील आधुनिक बदल, नवनवीन तंत्रज्ञान आणि स्पर्धेत लहान सराफ व्यावसायिक टिकण्याचे खरे आव्हान आहे.

Web Title: Gold and silver prices fall; Shot in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.