अंबाबाईच्या वैभवाला सुवर्णपालखीचे कोंदण

By Admin | Published: May 1, 2017 01:05 AM2017-05-01T01:05:36+5:302017-05-01T01:05:36+5:30

सोन्याच्या कारागिरीचा अप्रतिम नमुना : चारही बाजूंनी कोल्हापुरातील प्रमुख देवतांच्या प्रतिमा, विविध रंंगांच्या खड्यांची कलाकुसर

Gold of honor to Ambabai | अंबाबाईच्या वैभवाला सुवर्णपालखीचे कोंदण

अंबाबाईच्या वैभवाला सुवर्णपालखीचे कोंदण

googlenewsNext


इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूर
आदिशक्ती, शिवशक्तीचे स्थान, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख पीठ, सतीच्या दिव्य नेत्रांचे तेज आणि विविध राजवटींनी तिच्या चरणी अर्पण केलेले श्रद्धास्थान म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर. दोन हजार वर्षांपूर्वीचा धार्मिक इतिहास लाभलेल्या या देवीच्या राज वैभवाला, परंपरांना आता सुवर्णपालखीचे कोंदण लाभले आहे. ही सुवर्णपालखी आज, सोमवारी अंबाबाईला अर्पण करण्यात येणार आहे.
राक्षसांचा संहार करून करवीर क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या आदिशक्तीच्या या मंदिराची शिलाहार, चालुक्य, यादव अशा विविध राजवटींनी आपल्या परीने उभारणी केली. आक्रमणांच्या काळात संरक्षणासाठी म्हणून अंबाबाईची मूर्ती एका पुजाऱ्याच्या घरी ठेवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर १७१५ साली तिची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेला सप्टेंबर २०१५ मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने देवीच्या पालखीला सुवर्णझळाळी देण्याचा संकल्प खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांनी केला. त्यासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी सुवर्णपालखी ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
देवीच्या खजिन्यात आदिलशाही काळापासूनचे हिरे, मोती, माणिक पाचू अशा नवरत्नांचे जडावाचे अलंकार आहेत. आजच्या काळात या अलंकारांचे मूल्य कोट्यवधींमध्ये आहे. अष्टमीच्या नगरप्रदक्षिणेचे आसन, चैत्रात निघणारा देवीचा रथही चांदीचा करण्यात आला आहे. देवीची पालखी लाकडीच होती. देवीच्या नित्य धार्मिक विधींमध्ये दर शुक्रवारी, पौर्णिमा आणि नवरात्रौत्सवात पालखी निघते. त्यामुळे या पालखीला सोन्याची करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी अक्षय्यतृतीयेच्याच मुहूर्तावर करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते सुवर्ण संकलनाला प्रारंभ झाला. सुवर्णपालखी ट्रस्टने भाविकांना सोने अर्पण करण्याचे आवाहन केले आणि त्याला भरभरून प्रतिसाद देत तब्बल २७ हजार देणगीदारांनी दिलेल्या निधीतून २६ किलो २३ कॅरेट सोन्यापैकी साडेतीन किलो सोन्यात मोर्चेल आणि चवऱ्या घडविण्यात आल्या. त्या नवरात्रामध्येच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरित साडेबावीस किलो सोन्यामध्ये अंबाबाईच्या लाकडी पालखीला सोन्याच्या पत्र्याचा नक्षीदार मुलामा देण्यात आला. हॉलमार्किंगसुद्धा करण्यात आले आहे.
शंभर रुपयेही अमूल्य
कोल्हापुरात एखादे काम सुरूझाले आणि त्यास विरोध झाला नाही असे सहसा होत नाही. किंबहुना कोणतेही नवे काम आणि विरोध अशा समीकरणाचे पेटंटच कोल्हापूरच्या नावे नोंदले गेले आहे. अशा पार्श्वभूमीवर देवीच्या पालखीसही सुरुवातीला विरोध झाला होता; परंतु महाडिक यांचा निर्धार आणि भक्तांची साथ यामुळे हे काम पूर्णत्वास गेले. त्यासाठी भाविकांनी दिलेले शंभर रुपयेही अमूल्य होते.
देवीच्या कार्यासाठी भाजीवाले, भेळवाले, पाणीपुरीवाले, अपंग मुले अशा सर्वसामान्य आणि कष्टकरी लोकांनीही योगदान दिले आहे. व्यवहारात अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आली आणि भाविकांचा पैसा केवळ पालखीसाठी वापरण्यात आला. अन्य नियोजन, व्यवस्थापन, सोहळा याचा खर्च ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मीनाकाम आणि खड्यांचे कोंदण
संपूर्ण पालखीवर ऐश्वर्याचे प्रतीक असलेले हत्ती आणि पानाफुलांची वेलबुट्टी कोरण्यात आली आहे. पालखीच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत. चार बाजूंना मीनाकाम केलेले मोर आहेत, त्याच्यावर पांढऱ्या खड्यांचे कोंदण आहे. पालखीच्या खालील नक्षीकामावरदेखील लाल खडे लावण्यात आले आहेत. कलाकुसरीचे डिझायनिंग भरत ओसवाल यांनी केले आहे. गणेश चव्हाण, महेश चव्हाण, योगेश चव्हाण आणि अभिजित चव्हाण या बंधूंनी अत्यंत कौशल्याने पालखी साकारली आहे. त्यांना समीर पत्रा आणि भुभाई यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Gold of honor to Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.