सोने गेले आणि वर पाच हजार रुपयेही गेले
By admin | Published: June 22, 2017 06:18 PM2017-06-22T18:18:09+5:302017-06-22T18:18:09+5:30
गडहिंग्लज येथे अज्ञात जोडप्याची चलाखी; एका महिलेची लुबाडणूक
आॅनलाईन लोकमत
गडहिंग्लज , दि. २0 : गडहिंग्लज येथील बाजारपेठेत एका महिलेला गाठून मूल आजारी असल्याचा बहाणा करीत स्वत:कडील खोटी माळ महागडी सोन्याची असल्याचे भासवून तिचे खरे सोने आणि वर पाच हजार रुपये चलाखीने लंपास केले. याप्रकरणी एक अज्ञात स्त्री आणि पुरुष अशा दोघांवर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबतच्या अधिक माहितीनुसार, हणबरवाडी (ता. कागल) येथील सुमन बयाजी पोवार (वय ५९) ही महिला कामानिमित्त १६ जून रोजी गडहिंग्लज येथे आली होती. त्यावेळी येथील लक्ष्मी मंदिरानजिक एक अज्ञात महिला एका पुरुषासह तिच्याजवळ आली आणि तिने त्यांचे बाळ आजारी असल्याचे सांगितले.
बिलासाठी पैशाची आवश्यकता असून त्यासाठी सोन्याची माळ विकावी लागत असल्याचे सांगितले. तसेच ही महागडी माळ सुमन हिला तूच घे आणि त्या बदल्यात तुज्याकडील बोरमाळ आणि कर्णफुले देऊन वर पाच हजार रुपये दे अशी मागणी केली. त्यांच्या बोलण्याला भुलून सुमन हिने तिच्याकडील सोने आणि पाच हजार रुपये दिले. मात्र नंतर त्यांनी दिलेली माळ बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तिची फसवणूक झाल्याचे कळले.
सुमन हिच्या फियार्दीनुसार अज्ञात जोडगळी विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार अशोक शेळके याबत अधिक तपास करीत आहेत.